मुंबई: राजकीय पक्षांच्या विचारधारेवरून उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांवर सडकून टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील जाहीर सभेत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अवाक्षरही काढले नाही. यावेळी माझ्या हाती सत्ता द्या, ४८ तासांमध्ये राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी वरळी कोळीवाडा येथे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सभेत राज ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींचा खरपूस समाचार घेतला. भाजप व शिवसेना नको म्हणून लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केले. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी नको म्हणून भाजप आणि शिवसेनेला केले. त्यानंतर अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी होतो. सकाळी थाटलेल्या संसारानंतर अर्ध्या तासात घटस्फोट होतो. मग उद्धव ठाकरेंनी त्यांना डोळा मारला, जनाची नाही मनाचीही लाज नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राजकीय परिस्थितीवर टीका केली. वरळी विधानसभेत आपल्या पहिल्याच जाहीर सभेत सर्वांवर आक्रमक टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अवाक्षरही यावेळी काढले नाही. पाऊण तास चाललेल्या या भाषणात राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचा कोणताही उल्लेख केला नाही.
हेही वाचा >>>Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले माहितीये सगळ्यांना. काही विचारधाराच राहिलेली नाही. शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांच्या नावापुढचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले होते. उर्दूमधील होर्डिंगवर तर जनाब बाळासाहेब ठाकरे उल्लेख करण्यात आला होता. आज ते हयात असते तर एकेकाला फोडून काढले असते, असे राज ठाकरे म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd