पुणे : पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर लोकसभा स्वबळावर लढवण्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती काँग्रेसचे बारामती-शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांनी रविवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदार कुणाल पाटील यांना बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यानुसार पाटील यांनी काँग्रेस भवनात दोन्ही लोकसभा क्षेत्रांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार रामहरी रुपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते.

मोदी सरकारकडून महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने देशात रोष वाढत आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे काँग्रेसकडून संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद तुल्यबळ आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ स्वबळावर लढावेत, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र त्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील,’ असे पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to congress mla kunal patil the feeling of the workers is to contest the baramati shirur lok sabha elections on their own ccp 14 amy