लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा पुण्यात येत आहेत. विजयानंतर पहिल्यांदाच शहा पुणे शहरात येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे येत्या २२ फेब्रुवारीला पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यामध्ये केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक कोरेगाव पार्क येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार आहे. त्यासाठी अमित शहा उपस्थित राहतील.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या भाजपला सर्वात अधिक जागा मिळाल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहिल्यांदाच पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी शहर भाजपच्या वतीने केली जात आहे.
केंद्रीय गृह विभागाच्या होणाऱ्या या बैठकीचे नियोजन पुणे महापालिकेकडे देण्यात आले आहे. त्याची जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांच्याकडे असणार आहे. याच दिवशी पुणे जिल्हा परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या घरांचे वाटप करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठीदेखील अमित शहा उपस्थित राहणार आहेत. बालेवाडी येथे हा कार्यक्रम होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
घरकुल योजनेत लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि लाभार्थ्यांना घरांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संपूर्ण राज्याचा एकत्रित कार्यक्रम पुण्यात घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठकीचे अध्यक्षपद शहा भूषविणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांसह अन्य ११ अधिकाऱ्यांनाही विविध जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd