‘वॉशिंग्टनची कुऱ्हाड!’ हा संपादकीय लेख (२२ जानेवारी) वाचला. १९ आणि २० व्या शतकात अॅडम स्मिथचे भांडवलशाही तत्त्वज्ञान, कार्ल मार्क्सचा समाजवाद, दोहोंचे मिश्रण असलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना अशा विकासादरम्यान फ्रेंच आणि रशियन क्रांती हे निर्णायक टप्पे होते. साम्राज्यवाद नेस्तनाबूत होत असताना लोकशाही ही राज्यपद्धती सर्वाधिक स्वीकारली गेली. या नागमोडी मार्गात अमेरिकी लोकशाही आदर्शवत राहिली. तरीही तिच्या छुप्या आर्थिक साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षांना समाजवादी पर्यायाने काबूत ठेवले होते. विसाव्या शतकाच्या अखेरीस तथाकथित खासगीकरण, उदारमतवाद आणि जागतिकीकरण या आर्थिक धोरणांमुळे जगभरात जी उलथापालथ झाली त्याचा परिणाम असा की, आर्थिक भांडवलाने राज्यकर्ते अंकित केले आणि अस्मितेच्या राजकारणाला बळ दिले. त्यामुळे अतिरेकी राष्ट्रवाद, धर्मांधता, आर्थिक विषमता आणि युद्धखोरी वाढली. शतकांचे प्रबोधन आणि भौतिक विकास यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे संस्कार रुजू लागले, शोषित वर्ग बंड करू शकले, अगदी आपल्या वारकरी संप्रदायानेसुद्धा ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशी शिकवण दिली. परंतु गेल्या चार दशकांत चक्रे उलट्या दिशेने फिरली आणि देशोदेशीचे उपटसुंभ सत्ताधारी झाले. आज वर्ण, जाती, वर्ग हे भेदाभेदभ्रमसुद्धा मंगल झाले आणि अस्मितेच्या राजकारणाला सुगीचे दिवस आले. ते बदलण्यासाठी जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही. परंतु त्यासाठी डेटाच्या मगरमिठीचा मोठा अडथळा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा