कल्याण – एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या बँक खातेदाराला आम्ही तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांंगून ग्राहकाच्या हातामधील बँकेचे मूळ एटीएम कार्ड भुरटे चोर ताब्यात घ्यायचे. हातचलाखी करून स्वताजवळील बनावट एटीएम कार्ड बँक ग्राहकाच्या ताब्यात देऊन तेथून पळ काढून ग्राहकाच्या खात्यामधील रक्कम अन्य एटीएम केंद्रात जाऊन एमटीएमच्या माध्यमातून काढणाऱ्या एकाला येथील महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

दीपक बिपीन झा (३२) असे आरोपीचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील रमाबाई आंबेडकर झोपडपट्टीमध्ये राहतो. त्याच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक या जिल्ह्यांमध्ये असे फसवणुकीचे प्रकार केले आहेत. त्यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाणे, मुंब्रा, भिवंडी, रामनगर, कोनगाव, रबाळे, ठाणे, शिवाजीनगर अशा विविध पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात कोळसेवाडी येथे राहणारे महेश्वरी मुदलीयार (२८) या आपल्या आईसोबत कल्याण पश्चिम येथे कोटक महिंद्रा बँकेत एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी गेल्या महिन्यात आल्या होत्या. दोन अनोळखी इसमांनी त्यांना एटीएमच्या बाहेर गाठून आम्ही तुम्हाला पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून मुदलीयार यांच्या जवळील एटीएम कार्ड स्वताच्या ताब्यात घेतले आणि हातचलाखी करून जवळील बनावट एटीएम कार्ड मुदलीयार यांंच्या ताब्यात दिले. तेथून पळ काढून मुदलीयार यांच्या बँक खात्यामधून अन्य एटीएममधून २२ हजाराची रक्कम काढली होती, महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ निरीक्षक साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी एक तपास पथक तयार करण्यात केले. एटीएम केंद्राबाहेरील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी उल्हासनगर येथून दीपक झा याला अटक केली होती. दीपकने आपण मुदलीयार यांची बोलण्यात गुंतवून फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली. याशिवाय नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, भिवंडी भागात असे गुन्हे साथीदाराच्या साहाय्याने केल्याची कबुली दिली.

हेही वाचा – ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी

दीपकने एकूण १६ गुन्हे केल्याची कबुली दिली. दीपक विरुद्ध कल्याण, भिवंडी, ठाणे भागातील पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. दीपककडून अनेक बँकांची ९२ एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. याशिवाय २६ हजाराची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. चोरीसाठी ते मोटार सायकल वापरायचे.

ही अटकेची कारवाई साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी वाघ, हवालदार के. जी. जाधव, मनोहर चित्ते, जितेंंद्र चौधरी, आनंद कांगरे, किशोर सूर्यवंशी, दीपक थोरात, सुमित मधाले, श्रीधर वडगावे यांच्या पथकाने केली.