डोंबिवली: डोंबिवलीतून माणकोली उड्डाण पूल मार्गे ठाणे, मुंबईकडे आणि नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा ओघ वाढल्याने मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गालगतची माणकोली, पिंपळास, वेल्हे, पिंपळनेर, भटाळे गावांमधील ग्रामस्थ धूळ, वाहन कोंंडीने मागील काही महिन्यांंपासून हैराण आहेत. माणकोली पुलावरून येणाऱ्या वाहनांना महामार्गाला पोहचण्यासाठी पोहच रस्ते, भुयारी मार्गाची सुविधा नसल्याने चालक लगतच्या गावांमधील अरूंंद रस्त्यांंवरून वाहने नेत असल्याने ग्रामस्थ धूळ आणि वाहन कोंडीने हैराण आहेत.

माणकोली पूल सुरू करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गालगतचा भुयारी मार्ग, महामार्गाला लागण्यासाठी पोहच उड्डाण पूल तयार करणे आवश्यक होते. हे रस्ते तयार न करता माणकोली पूल सुरू करण्यात आला आहे. आता वाहन चालक माणकोली, वेल्हे गावातील अंतर्गत अरूंंद रस्त्यावरून वाहने नेत आहेत. डोंबिवलीतून ठाणे, मुंबईकडे जाण्यासाठी माणकोली उड्डाण पूल हा कमी वेळेतील, वाहन कोंडी मुक्त रस्ता असल्याने प्रवासी या रस्त्याला प्राधान्य देत आहेत. डोंबिवलीतून रेतीबंदर येथील रेल्वे फाटक ओलांडून वाहने माणकोली पुलावरून सुसाट निघाली की वाहने आठ मिनिटात लोढा गृहासंंकुलासमोरील रस्त्यावरून भिवंडी जवळील मुंंबई-नाशिक-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांंक तीनला लागतात.

हेही वाचा : कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!

डोंबिवलीतून शिळफाटा, दुर्गाडी पूल मार्गे जाण्यासाठी लागणारा अर्धा ते पाऊण तासाची बचत माणकोली पुलामुळे होत आहे. ही सर्व वाहने प्रशस्त रस्त्यांची सुविधा नसललेल्या माणकोली, वेल्हे गावातील अरूंद बैलगाडी जाईल एवढ्या रुंदीच्या रस्त्यावरून धावत आहेत. एकावेळी डोंबिवलीतून ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या आणि ठाणेकडून डोंबिवलीत जाणारी वाहने माणकोली, वेल्हे गाव हद्दीत आली की या भागातील रस्त्यांवर दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे. गावातील रस्ते कच्चे आणि धुळीच आहेत. त्यामुळे सततच्या धुळीने आणि वाहन कोंडीने ग्रामस्थ हैराण आहेत.

माणकोली गावातून महामार्गाला लागण्यासाठी साईनाथ हाॅटेल, लोटस रुग्णालय भागात उंच चढाव आणि उतार आहेत. या भागात वाहने समोरासमोर आली की कोंडी होते.नाशिक दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना डोंबिवलीत माणकोली पूलूमार्गे जाण्यासाठी वेल्हे गाव हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे ही सर्व वाहने दिवसभर वेल्हे गावातील अरूंद रस्त्यावरून धावतात. सुरूवातील माणकोली, वेल्हे भागातील ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना मज्जाव केला होता. याऊलट त्यामुळे गावात कोंडीचे प्रमाण वाढू लागले. बाहेरून येणाऱ्या चालकाला पर्यायी रस्ते माहिती नसल्याने ते या रस्त्याला प्राधान्य देत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.

हेही वाचा : ठाण्यात पाणी बचतीसाठी पालिकेने लागू केले निर्बंध; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माणकोली गावाजवळ भुयारी मार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करून ठाणेकडून येणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा मार्ग मोकळा करून द्यावा. माणकोलीकडून महामार्गाला जाणाऱ्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे. ही कामे रखडल्याने माणकोली परिसरात माणकोली पूल सुरू झाल्यापासून वाहन कोंडी आणि धुळीने ग्रामस्थ हैराण आहेत.

श्री माळी (माजी सरपंच, माणकोली.)