Snake enters in classroom through ac vent: घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. पण आपल्या राहत्या घरात, गल्लीबोळात, आजूबाजूच्या परिसरात, एवढंच नव्हे तर आपल्या शाळा-कॉलेजांमध्ये साप दिसला तर नक्कीच सगळ्यांचा थरकाप उडेल. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार नोएडा येथे घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत चक्क शिकवणी सुरू असताना एसीच्या व्हेंटमधून साप वर्गात शिरला आणि एकच गोंधळ उडाला.
एमिटी युनिव्हर्सिटी नोएडा येथे ही धक्कादायक घटना घडली, जिथे एक साप एअर कंडिशनिंग व्हेंटमधून वर्गात शिरला. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आणि विद्यार्थी आरडाओरडा करत वर्गातून पळून गेले. शुक्रवारी कॉलेज सुरू असताना घडलेल्या या घटनेने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video of Snake enters in classroom through ac vent)
व्हायरल झालेल्या या १३ सेकंदाच्या व्हिडीओत भरवर्गात एसी व्हेंटमधून साप हळूच बाहेर आला. हे पाहून काही विद्यार्थ्यांनी फोन काढला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, तर काही जणांना पहिल्यांदाच खराखुरा साप दिसल्याने धक्का बसला. यावेळेस शिक्षकही वर्गात उपस्थित होते आणि शिकवणी घेत होते.
हा व्हिडीओ @AaquilJameel या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीच्या लेक्चर हॉलमध्ये एका सापाने अनपेक्षितपणे एन्ट्री केल्याने विद्यार्थी हादरले” असं कॅप्शन दिलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, शिक्षकाने भीतीपोटी शिकवणी बंद केली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांना त्वरीत खोली रिकामी करण्याचे आदेश दिले आणि कॅम्पस सुरक्षाशी संपर्क साधला, यामुळे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली.
हेही वाचा… धडकी भरणारा VIDEO! हॉरर शो पाहून तरूणी लागली रडायला अन्…, पुढे जे घडलं ते फारचं भयानक
तसंच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करून सापाला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी प्राणी नियंत्रणाला बोलावण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, परंतु अचानक कॉलेजमध्ये आलेल्या या सापामुळे अनेक विद्यार्थ्यांची झोप उडाली.
दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, जिथे चक्क घरात, ऑफिसमध्ये तर कधी आजूबाजूच्या परिसरात साप फिरताना आढळला आहे.