नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. उन्मत्तपणा, असत्य, निराशावाद आणि अज्ञानात त्यांना आनंदी राहू दे, मात्र विभाजनवादी धोरणापासून लोकांनी सावध राहावे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर तोफ डागली. दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीतील बहुतांश पक्षनेत्यांनी बुधवारच्या नियोजित बैठकीला येणे टाळल्यामुळे आता ही बैठकच लांबणीवर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निकालांचे विश्लेषण करणाऱ्या एका वृत्तवाहिनीची ध्वनिचित्रफीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर प्रसृत केली. ‘मेल्टडाऊन-ए-आझम’ या शीर्षकाखाली त्यांनी विरोधकांवर तिखट शब्दांत हल्ला चढविला. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानातील काँग्रेसच्या पराभवामुळे प्रादेशिक दुही निर्माण करणारी ‘यंत्रणा’ कार्यान्वित झाल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. भाजपला निवडून दिल्यामुळे हिंदी भाषक राज्यांतील मतदारांचा अपमान केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधानांनी प्रथमच ‘इमोजी’चाही भरपूर वापर केल्याचे दिसले. समाजमाध्यमांवर एवढय़ा आक्रमकपणे पंतप्रधान क्वचितच प्रतिक्रिया देतात. आगामी काळात भाजप समाजमाध्यमांवर अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत यातून मिळाल्याचे मानले जात आहे. भाजपच्या एका नेत्याने मोदींच्या या ‘पोस्ट’चे विश्लेषण ‘‘एका तंत्रस्नेही फलंदाजाने मारलेला षटकार,’’ अशा शब्दांत केले. पंतप्रधानांच्या या ‘पोस्ट’वर सर्वसामान्य वापरकर्त्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ‘इमोजी’च्या अतिवापरावर आश्चर्य व्यक्त केले. काही वापरकर्त्यांनी आक्रमक भाषेचे स्वागत केले तर काही जणांनी यामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

हेही वाचा >>> भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार?

एकीकडे पंतप्रधानांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये सगळे आलबेल नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी बुधवारी आयोजित केलेल्या ‘इंडिया’च्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास अनेक नेत्यांनी विविध कारणे देत असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही बैठक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत लांबणीवर पडली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते नितीशकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचे संकेत आधीच दिले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दौऱ्याचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला. तामिळनाडूतील चक्रीवादळामुळे ‘द्रमुक’चे प्रमुख व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बैठकीला येण्यास असमर्थता दर्शविली. आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीबाबतही संदिग्धता होती. प्रमुख नेत्यांपैकी केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला हजर राहणार असल्याचे निश्चित होते.

केवळ अनौपचारिक सहभोजन

‘इंडिया’ची बैठक रद्द झाली असली तरी खरगे यांच्या निवासस्थानी बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील गटनेत्यांचे स्नेहभोजन होणार आहे. ही अनौपचारिक बैठक असून विद्यमान राजकीय परिस्थिती तसेच, ‘इंडिया’ आघाडी मजबूत करण्यासंदर्भात यावेळी चर्चा केली जाईल, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

७० वर्षे जुन्या सवयी सहजासहजी जात नाहीत. उन्माद, असत्य, निराशावाद आणि अज्ञानात त्यांना आनंदी राहू दे.. मात्र जनता सूज्ञ असून या मंडळींना अशा आणखी पतनाची तयारी ठेवावी लागेल.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसचे वर्चस्व मित्रपक्ष झुगारणार?

‘काँग्रेस उद्दामपणा करणार असेल तर लोकसभेला त्यांच्याबरोबर आघाडी कोण करेल,’ असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. पराभवामुळे काँग्रेसचा अहंकार कमी होईल अशी आशा आहे. त्यानंतर पुढील बोलणी करता येतील, असे सांगत त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व झुगारण्याचे स्पष्ट संकेत दिले. घटक पक्षांची आघाडी झाली असती तर मतविभाजन झाले नसते, असे सांगत ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे काँग्रेसला महत्त्व न देता आपापल्या ताकदीवर लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत मित्रपक्षांनी दिल्याचे मानले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi attacked opposition after winning rajasthan madhya pradesh and chhattisgarh poll zws