अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. आज निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

“निलेश लंके यांच्या प्रचाराच्या खूप सभा पाहिल्या आहेत. शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य सभेत गेले. त्यानंतर सर्वात जास्त निवडणुका करण्यामध्ये माझा नंबर लागतो. लंकेंच्या सर्व सभांमध्ये करंट असतो. साधा लाईट लागण्यामध्ये ३६० व्होल्टेजचा करंट असतो. पण तुमचा करंट तीन हजार व्होल्टेजचा आहे. ज्यावेळी तुमच्यामध्ये तीन हजार व्होल्टेजचा करंट असेल तेव्हा शॉक केवढा राहणार? जाळ होणार जाळ”, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य; म्हणाले, “त्यांची नार्को टेस्ट…”

“निलेश लंके यांच्या सभेला हजारोंच्या संख्यने लोक येत आहेत. आपण म्हणतो की, याची हवा, त्याची हवा. पण हवा राहिली नाही. आता हे वादळ आलं असून आपला मोठा विजय होणार आहे. या चर्कीवादळात कोण कोणाला फेकून देणार, पाहा ते कसं लांब उडून जाऊन पडेल”, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना नाव न घेता लगावला.

पंतप्रधान मोदींवर टीका

“आपल्याला शेवटचे मत पूर्ण होईपर्यंत काळजी घ्यायची आहे. चांगले काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व सभा फेल आहेत. काय बोलतात हे त्यांचं त्यांना कळतं की नाही, अशी अवस्था आहे. काद्यांची निर्यात फक्त गुजरातमधून होते. मग नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? गुजरातसाठी तुम्ही फार निर्णय घेता. खूप गोष्टी गुजरातला चालल्या आहेत. मला तर आणखी एक गोष्ट समजली. आता आयपीएल सुरू आहे. तिथे मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा व्हायला हवा तिथे हार्दिक पांड्या झाला. यामुळे क्रिकेटवाले लोकही नाराज झाले. कारण तोही गुजरातचा आहे. जर खेळातही गुजरात आणायला लागले तर ही जनता पुन्हा तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader balasaheb thorat on bjp mp sujay vikhe radhakrishna vikhe patil in nilesh lanke rally ahmednagar gkt