लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले आहेत. आता सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर निकाल लागणार आहे. या निकाला दरम्यान नेमकं काय होतं? ते पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच एक खुलं पत्रही पोस्ट केलं आहे. ज्याची चर्चा रंगते आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात?

महाराष्ट्राचे आभार!

सप्रेम नमस्कार
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवात, निवडणूक प्रक्रियेत अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतले. मतदारांच्या मनामनात मोदी होते. त्यामुळे त्यांनी अतिशय उत्स्फुर्तपणे भाजपाला साथ दिली. मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी आहे.

कार्यकर्त्यांचे आभार

१६ मार्च २०२४ या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या आणि तेव्हापासून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. भाजपात आपण कायमच निवडणुकीसाठी सज्ज असतो. संघटनात्मक कार्य ही आपली सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नव्याने तयारी करावी लागत नाही. पण तरीही १६ मार्चपासून आपला प्रत्येक कार्यकर्ता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अहोरात्र झटला. राज्यातील पाचही टप्प्यांत प्रचंड परिश्रम करणाऱ्या तुम्हा सर्वांना मी सलाम करतो, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज ठाकरेंचेही आभार

महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भक्कम साथ दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेही महायुतीच्या बाजूने उभे राहिले. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, पिरिपाचे जोगेंद्र कवाडे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि इतर सहयोगी पक्षांनी सुद्धा परिश्रम घेतले. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक प्रचार मोहिमेचे यशस्वी संचलन झाले. आमचे प्रभारी दिनेश शर्मा, सहप्रभारी निर्मलकुमार सुराना, जयभानसिंग पवैय्या यांचे मार्गदर्शन संपूर्ण निवडणूक प्रचार प्रक्रियेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लाभलं. मी त्यांचाही मनःपूर्वक आभारी आहे.

आपल्या सर्वांच्या परिश्रमाने आपण महाराष्ट्रात चांगले यश संपादन करु आणि निश्चितच ४ जूननंतर आपले लाडके नेते नरेंद्र मोदी हे पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी प्रधानसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारतील यात शंका नाही.

पुनश्च: एकदा सर्वांचे मनापासून आभार

आपला
देवेंद्र फडणवीस

https://x.com/Dev_Fadnavis/status/1792621243826315395

असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मतदारांना आणि भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सहयोगी पक्षांना उद्देशून लिहिलं आहे. सोशल मीडियावर हे पत्र चर्चेत आहे.