महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान मोदींना आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर निवडणूक पार पडली. भाजपाला २४० तर एनडीएला एकूण २९३ जागा मिळाल्या. एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर एकूण ७१ जणांना शपथ देण्यात आली. मात्र राज ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं. त्याबाबत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे रालोआचा घटक पक्ष नाही त्यामुळे…

मनसे पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नाही. पण एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. पण निमंत्रण असते तर कुठं दिसले असते, असे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फूट? भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना विधानपरिषदेसाठी आमनेसामने

गरज असेल तेव्हा उंबरे झिजवायचे आणि संपली की दरवाजे लावायचे

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपामध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही, हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray : लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

राज ठाकरेंनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या ते उमेदवार विजयी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसंच राज ठाकरेंनी कणकवलीत नारायण राणेंसाठी, कळवा आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी सभा घेतल्या होत्या. पुण्यात त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली होती. या सगळ्यांना चांगलं यशही मिळालं. मुरलीधर मोहोळ तर मंत्रीही झाले आहेत. अशात राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नव्हतं हेच दिसून आलं. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी मोदींवर स्तुती सुमनं उधळली होती हे देखील महाराष्ट्राने पाहिलं आहे.