Mango and Blood sugar : उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. सध्या प्रत्येक जण आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. तुम्ही आंबे कधी खाता? तुम्हाला सकाळी नाश्त्यामध्ये आंबा खायला आवडते का? पण सकाळी आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, असं म्हणतात. हे खरंय का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने माहिती जाणून घेतली.
तुम्हाला संतुलित आहार घेता यायला हवा. फळे नियंत्रित खा, प्रोटीन्स व फॅट्सबरोबर फळे खा आणि नेहमी तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मोजा, असे अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात.
जर तुम्हाला तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याविषयी काळजी वाटत असेल आणि तरीही तुम्हाला सकाळी नाश्त्यात आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही खालील गोष्टींचा अवलंब करू शकता. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी विविध पोषक घटक शरीरास पुरवते. त्यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे संतुलित आहारात भर घालतात. तुमच्या कार्बोहायड्रेट सेवनावर लक्ष केंद्रित करून, तुम्ही सकाळच्या दिनचर्येत आंब्याचा समावेश कसा करू शकता, हे जाणून घ्या.
नियंत्रित सेवन
संयम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. संपूर्ण आंबा खाण्याऐवजी आंबा ठरावीक प्रमाणात खा. आंब्याचे सामान्य सर्व्हिंग हे एक कप किंवा सुमारे १५० ग्रॅम असते. तुमच्या रक्तातील साखरेनुसार आंब्याच्या सेवनावरून तुमचे कार्बोहायड्रेटचे प्रमाण मोजा आणि त्यानुसार आंब्याचे सर्व्हिंग अर्धे करा.
आंबा कधी खावा?
आंब्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे उपाशीपोटी सकाळी आंबा खाऊ नये. आंबा जेवणादरम्यान स्नॅक म्हणून उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला आंबा नाश्त्यामध्ये खायचा असेल, तर इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांबरोबर खा; पण कधीही गोड पदार्थ म्हणून किंवा जेवण झाल्यानंतर खाऊ नका. कारण- असे खाल्याने तुम्ही जेवणात घेतलेल्या कार्बोहायड्रेट्समध्ये आणखी भर पडते आणि त्यामुळे तुमच्या शरीरात फक्त कॅलरीज वाढतात.
प्रथिने व आरोग्यदायी चरबीबरोबर सेवन करा –
प्रथिने व आरोग्यदायी चरबीबरोबर आंबा खाल्ला, कर्बोदकांचे पचन आणि शोषण हळुवार करण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर कमी परिणाम होतो. तुम्ही आंब्याचे काप ग्रीक दही, कॉटेज चीज व मूठभर काजूबरोबर खाऊ शकता.
ग्लायसेमिक इंडेक्स (GI) लक्षात घ्या
रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढते, यावरून ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो म्हणजेच आंब्याच्या सेवनाने रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये मध्यम वाढ होऊ शकते. तरीसुद्धा आंब्यामधील अन्नतंतू साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही साखरेच्या अचानक वाढीविषयी संवेदनशील असाल, तर तुम्ही आंब्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे किंवा प्रथिने व आरोग्यदायी चरबीसोबत आंबा खावा.
कैरी खा
पिकलेल्या गोड आंब्यांच्या तुलनेत कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. अन्नतंतूसुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही कैरीचा आस्वाद सॅलड, चटणी तसेच साइड डिश म्हणूनसुद्धा घेऊ शकता. कैरी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम कमी करता येतो आणि गोडपणा आणि अन्नतंतू यांचे संतुलन राखता येते.
कर्बोदकांचे एकूण प्रमाण तपासा
दिवसभरात तुम्ही किती प्रमाणात कर्बोदकांचे सेवन करता, याबाबत संतुलन राखणे आवश्यक आहे. जर तुम्ही नाश्त्यात आंबे खात असाल, तर दिवसभरात तुम्ही वापरत असलेल्या इतर कर्बोदकांच्या स्रोतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कर्बोदकांचे एकूण सेवन नियंत्रित ठेवून, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवू शकता. एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे ४५-५० ग्रॅम कर्बोदके असू शकतात. म्हणूनच कर्बोदकांचे प्रमाण तपासा.
पौष्टिक प्रोफाइल
एक कप (१६५ ग्रॅम) आंब्यामध्ये खालील पौष्टिक घटक असतात.
उष्मांक : ९९ ग्रॅम
प्रथिने : १.४ ग्रॅम
कर्बोदके : २४.७ ग्रॅम
चरबी : ०.६ ग्रॅम
अन्नतंतू : २.६ ग्रॅम
साखर : २२.५ ग्रॅम
व्हिटॅमिन सी : नियमित प्रमाणाच्या ६७ टक्के
तांबे : नियमित प्रमाणाच्या २० टक्के
फोलेट : नियमित प्रमाणाच्या १८ टक्के
व्हिटॅमिन बी६: नियमित प्रमाणाच्या १२ टक्के
व्हिटॅमिन ए: नियमित प्रमाणाच्या १० टक्के
व्हिटॅमिन ई:नियमित प्रमाणाच्या १० टक्के
व्हिटॅमिन के: नियमित प्रमाणाच्या ६ टक्के
नियासिन: नियमित प्रमाणाच्या ७ टक्के
पोटॅशियम: नियमित प्रमाणाच्या ६ टक्के
रिबोफ्लेविन: नियमित प्रमाणाच्या ५ टक्के
मॅग्नेशियम: नियमित प्रमाणाच्या ४ टक्के
थायमिन: नियमित प्रमाणाच्या४ टक्के
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण सर्वाधिक असते आणि आंब्याच्या सेवनाचा हा सर्वांत मोठा फायदा आहे. कारण- त्यामुळे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदते. तसेच शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते, खराब पेशी बरे करण्यास मदत करते आणि पुन्हा नवीन पेशी निर्माण करते.