लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक आहे. सध्या या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघामधून माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत. आज ठाण्यात निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी महायुतीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कोकणाने…”

आमदार गणेश नाईक काय म्हणाले?

“आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पण आमच्या दृष्टीकोनातून देवेंद्र फडणवीस हेच आमचे लीडर आहेत. मी तर ओपन बोलतो, म्हणजे प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत. मात्र, पक्षाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस. त्यांच्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्षाचा कारभार चालतो, तसेच तो भविष्यातही चालणार आहे”, असं भाष्य भाजपाचे आमदार गणेश नाईक यांनी यावेळी केलं.

आमदार गणेश नाईक पुढं म्हणाले, “मनसेचे अभिजीत पानसे यांना मागे टाकले. मात्र, ते योग्यवेळी पुढे येतील. ठाणे जिल्ह्यामध्ये ३३ टक्के मतदार आहेत. मोठ्या लोकांकडून कधी कधी छोट्या चुका होतात. मात्र, तुम्ही काळजीपूर्वक मतदान करा”, असं आवाहन आमदार गणेश नाईक यांनी यावेळी मतदारांना केलं. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या मेळाव्याच्या माध्यमातून विरोधकांवर भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागामध्ये आपल्या महायुतीला सर्वांच्या आशीर्वादाने मोठं यश प्राप्त झालं. काही लोकांनी अशी गर्जना केली होती की, आम्ही महायुतीला तडीपार करू. पण कोकणाने त्यांना तडीपार केलं. या ठिकाणी पाच जागा या महायुतीच्या निवडून आल्या. यामध्ये एक भिवंडीची जागा आपली निवडून येवू शकली नाही. आता भिवंडीची जागा का निवडून आली नाही, याची आपल्याला कल्पना आहे. जे मुंब्रा या ठिकाणी घडलं, तेच भिवंडीमध्येही घडलं. मात्र, हे देखील सुधारण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.