Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या हा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी त्यासाठी एक गणितच मांडलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाचं गणित मांडूनच शरद पवारांना उत्तर दिलं. आता आज भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शरद पवारांनी अपयश झाकण्यासाठी असा खोटारडेपणा करु नये असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांनी काय गणित मांडलं?

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

शरद पवारांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी असा खोटारडेपणा…-बावनकुळे

शरद पवार यांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करणं योग्य नाही. पराभव झाल्यावर तो स्वीकारायला हवा होता. पण पराभव स्वीकारता येत नाही म्हणून जनतेला कन्फ्युज करण्याचं आणि आपलं अपयश लपवण्याचं काम हे शरद पवार करत आहेत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी केली.

हे पण वाचा- Eknath Khadse : एकनाथ खडसेंचे सूर बदलले! “देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत वैर नाही, आम्ही काय भारत-पाकिस्तानासारखे…”

ईव्हीएमवर आधी आक्षेप का घेतला नाहीत?

विधानसभेत प्रचंड मोठा पराभव त्यांचा झाला. जनतेने त्यांना नाकारलं आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे. आता शरद पवार जनतेला कन्फ्युज करत आहेत. मारकडवाडीत आलेले लोक हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत असाही आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जनतेनी लोकसभेचा खोटारडेपणा विधानसभेला दाखवून दिला. जर इतकंच असेल तर मारकडवाडीत यापूर्वी ज्या ज्या वेळी ईव्हिएमवर मतदान झालं तेव्हा आक्षेप का घेतले नाहीत? त्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर आक्षेप घ्यायला हवे होते ना? आता जाणीवपूर्वक महाराष्ट्राची दिशाभूल करुन शरद पवार आपलं अपयश झाकण्याचं काम शरद पवार करत आहेत अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी ( Chandrashekhar Bawankule ) केली.

महाविकास आघाडीच्या नौटंकीला लोक कंटाळले आहेत-बावनकुळे

शरद पवार, राहुल गांधी किंवा अजून त्यांच्या मविआच्या नेत्यांनी कितीही नौटंकी केली तरी काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्र यांच्या नौटंकीला कंटाळला आहे. महायुती विकास करते आहे हे जनतेला कळलं आहे त्यामुळे महाराष्ट्राने महायुतीला मतदान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असंही बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीला वाटत असेल की ईव्हीएममध्ये चूक आहे तर मग निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे. अनेक निवडणुका झाल्या आहेत ज्यात अपयशही आलं आहे. लोकसभेत आम्हाला अपयश आलं आम्ही काही ईव्हीएमला दोष दिला नाही. ज्या चुका झाल्या त्या सुधारुन आम्ही पुढे गेलो. आता या वयात शरद पवार यांनी किती खोटेपणा करायचा? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंनी ( Chandrashekhar Bawankule ) विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule criticized sharad pawar said he is confusing people scj