Dasara Melava Beed News : विधानसभेची निवडूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते आपल्या पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीची रणनीती आखत आहेत. यातच आता दसरा जवळ आल्यामुळे राज्याच्या राजकारणात मुंबई, नागपूर, बीड अशा ठिकाणी दसरा मेळावे होत असतात. त्यामुळे दसरा मेळाव्यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा असते. यामध्ये बीडमध्ये संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट याठिकाणी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो. पण यावेळी या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच बहीण-भाऊ अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडे यांनी काय म्हटलं?

“चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…!”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘नॉन क्रीमीलेअर’ उत्पन्न मर्यादा १५ लाख? केंद्राला शिफारस ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव

दरम्यान, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही वर्षांपासून सावरगाव घाट या ठिकाणी दसरा मेळावा घेतात. या मेळाव्यासाठी राज्यभरामधून पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते तसेच भगवान बाबांचे भक्त येत असतात. या मेळाव्याची राज्याच्या राजकारणात देखील चर्चा असते. या मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे हे देखील पहिल्यांदा या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये यंदा दोन दसरा मेळावे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलन केलं. मात्र, राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील दसरा मेळावा घेण्याची घोषणा केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा हा नारायण गडावर होणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात आता दोन दसरा मेळावे होणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dasara melava beed news dhanjay munde will attend pankaja mundes dussehra gathering in dasara melava gkt