Harshvardhan Patil : राजकारणाकडे कायमच कुस्तीचा फड किंवा बुद्धिबळाचा पट म्हणून पाहिलं जातं. कारण इथले राजकीय डावपेच हे कुस्तीतल्या डावांप्रमाणेच असतात. फोडाफोडी, आस्मान दाखवणं, कात्रजचा घाट दाखवणं, धोबीपछाड देणं, शह देणं हे सगळं राजकारणात सुरुच असतं. अशात दोन दिग्गज नेते जेव्हा असं करतात तेव्हा तर याची चर्चा नक्कीच होते. देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या आधी शरद पवार धक्का देण्याच्या तयारी आहेत. कारण आता भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन पाटील भाजपाची साथ सोडणार?
भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) हे देवेंद्र फडणवीसांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची घेतलेली भेट. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये शरद पवारांनी एक बैठक घेतली. ज्यानंतर हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) आणि त्यांची बैठक पार पडली. मागच्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसंच येत्या काही दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) हे भाजपाचं कमळ सोडून शरदचंद्र पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नऊ नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात?
हर्षवर्धन पाटीलच ( Harshvardhan Patil ) नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीबरोबर असलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात अशी शक्यता आहे. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूरचे प्रशांत परिचारक , इंदापूरचे हर्षवर्धन पाटील , पुण्यातील बापू पाठारे , भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. असं घडलं तर भाजपासाठी तो धक्का असणार यात शंकाच नाही.
हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
आज मी शरद पवारांना भेटलो, अडीच ते तीन तास आम्ही चर्चा केली. मात्र आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. माझ्याशीही काही कुणी राजकीय चर्चा केलेली नाही. चंद्रशेखर बावनकुळे जे बोलले तो संदर्भ मला माहीत नाही. पण मी कुठलाही निर्णय वगैरे घेतलेला नाही. अजित पवारांचे जे दौरे सुरु आहेत त्यात बोललं जातं आहे की सिटिंग आमदाराला तिकिट मिळणार. माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे की मला तिकिट मिळावं. सगळे तपशील बाहेर सांगणं योग्य नाही. पण अजित पवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य करेन. देवेंद्र फडणवीसांनीही सांगितलं होतं की मी निर्णय घेईन. आता आम्ही वाट पाहतो आहे की फडणवीस काय निर्णय घेत आहेत. असं हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत काय म्हणाले?
“कोण कुणाची भेट घेतं आहे ते महत्त्वाचं नाही. भाजपात लोक प्रवेश करत आहेत. पुढेही प्रवेश होतील. निवडणुकीच्या काळात इकडचे तिकडे जातात पण मला विश्वास आहे की हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबर राहतील” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd