आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांच्यावरील हेमंत बिस्वा शर्मांच्या वक्तव्याचा निषेध करत पटोले म्हणाले, “बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारं आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दलही हीन दर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही”.

बिस्वा शर्मा यांना या रोगापासून आराम मिळो अशी आमची सदिच्छा आहे. बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोमणाही पटोले यांनी मारला.

पटोले पुढे म्हणाले, “लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्यामुळे एक जबाबदार विरोधीपक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात.” बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते मात्र त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत, देव त्यांना सदबुद्धी देवो हीच आमची सदिच्छा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा – “तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाले होते बिस्व शर्मा?

“तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? आमच्या सैनिकांनी संपावर गेल्याचे सांगितले असेल, तर पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,” असं विधान हेमंत बिस्व शर्मा यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole rahul gandhi hemant biswa sharma cm assam vsk