Jitendra Awhad On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितल्यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. अजित पवार गटाला उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून दिला आहे. यानंतर आता या आमदार अपात्रता प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे. “अजित पवार गटाला काहीही करून पळ काढायचा आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “१० दिवसांत मला राज्यपाल केलं नाही तर…”, शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा; महायुतीत जुंपली?

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“मी दिल्लीत राजकीय कारणांसाठी आलो नव्हतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती. त्याबाबत आलो होतो. मात्र, उद्धव ठाकरेही दिल्लीत आले असल्याचं मला समजलं म्हणून मग त्यांचीही भेट घेतली”, असं आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नाही. हे पाहून थोडसं नैराश्य आलं आहे. न्यायव्यवस्था तराजू घेऊन उभी आहे. मात्र, त्यातून न्याय मिळत नसेल तर खेदजनक बाब आहे. अजित पवार गटाला कसंही करुन यामधून पळ काढायचा आहे. त्यातच जर त्यांना सहाय्य होईल अशा गोष्टी घडत असतील तर अजून वेळ वाढवून घेतील”, असं जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

न्यायालयातील सुनावणी का पुढे ढकलली?

आज सर्वोच्च न्यायालयामध्ये १४ प्रकरणाची सुनावणी होती. यामध्ये ७ नंबरला राष्ट्रवादीचं आमदार अपात्रता प्रकरण होतं. या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दाखल करण्यास सांगितलं होतं. मात्र, अजित पवार गटाच्या आमदारांकडून अद्याप उत्तर दाखल करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार गटाकडून उत्तर दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून वेळ वाढवून मिळण्याची विनंती करण्यात आली. यानंतर आता या प्रकरणावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.