लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : माढा लोकसभेसाठी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी त्यांचे चुलते, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पूरक अर्ज दाखल केला.

एकीकडे भाजपच्या उमेदवारांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची जोड मिळाली असताना दुसरीकडे भाजपला जोरदार झटका देत राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन टाळले. आपले शक्तिप्रदर्शन ४ जून रोजी विजयोत्सवातून शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

आणखी वाचा-गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणूक अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, काँग्रेसचेजिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आदी हजर होते.

उमेदवारी दाखल करण्यासाठी सोलापुरात दाखल झाल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी सात रस्त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याशिवाय रेल्वे लाईन भागात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यासह सिध्देश्वर देवस्थान व अन्य मोठ्या संस्थांशी संबंधित बडे प्रस्थ समजले जाणारे धर्मराज काडादी यांच्या गंगा निवास’मध्ये जाऊन त्यांचीही भेट घेतली. सुशीलकुमार शिंदे व काडादी यांच्याशी मोहिते-पाटील यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खलबते झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group has filed its candidacy of dhairyashil mohite patil in madha mrj
Show comments