नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेते सोमवारी नांदेडमध्ये प्रथमच एकत्रपणे येत असून, त्यांच्या व इतर नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेत भाजपाचा ‘शंखनाद’ होणार आहे. शहा आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तिंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गतवर्षी लोकसभा निवणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा नांदेडमध्ये आले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाला ‘शत-प्रतिशत’ यश मिळाले. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शंखनाद करण्यासाठी शहा व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही सभा नवा मोंढा मैदानावर दुपारी ३ ते ५ दरम्यान होईल. या सभेच्या माध्यमातून सैन्य गौरवाचा, भाजपाच्या खंबीर नेतृत्वाचा आणि विकसित भारताचा शंखनाद करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

पक्षनेते नरेंद्र मोदी २०१४ साली २६ मे रोजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. त्यास सोमवारी ११ वर्षे पूर्ण होत असून, भाजपाने वरील सभेसाठी त्याचेही औचित्य साधले असून, शहा आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत काहींचा पक्षप्रवेशही होणार आहे. पण आतापर्यंत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, त्यांचे माजी नगरसेवक पुत्र विश्वास यांच्याच भाजपा प्रवेशाची माहिती समोर आली. काँग्रेसच्या काही माजी आमदारांची नावे चर्चेत असली, तरी त्यांनी तसेच जाहीर केलेले नाही.

केंद्रीय गृहमंत्री आणि अन्य भाजपा नेत्यांच्या यातील सर्व कार्यक्रमांची सूत्रे पक्षाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या हाती प्रथमच एकवटली असून, त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या माध्यमातून भडक वातावरणनिर्मिती केली आहे. विमानतळ ते वसंतराव नाईक पुतळा, गुंडेगावकर पेट्रोलपंप ते वर्कशॉप कॉर्नर आणि श्रीनगर ते आयटीआय आणि पुढे नवा मोंढ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस भाजपा पदाधिकारी यांनी प्रचंड बॅनरबाजी केली असल्याचे दिसून आले.

या निमित्ताने भाजपाच्या स्वमालकीच्या जिल्हा कार्यालयाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. त्यावर खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारच्या वार्ताहर बैठकीत जुजबी स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या महानगर शाखेसाठी अन्य ठिकाणी कार्यालय थाटण्यात आले असून, त्याचे तसेच पक्षाचे राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहा आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.