मुंबई : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्याोग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञानमंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.

नामवंत प्रकाशन संस्थेसाठीचा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर झाला आहे. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी यांना आणि श्री. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.

ग्रामीण साहित्य २०२३ चे पुरस्कार

वाङ्मय पुरस्कार प्रकारात प्रौढ वाङ्मयअंतर्गत काव्य प्रकारामध्ये कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. नाटक / एकांकिका करिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, कादंबरीकरिता हरी नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, लघुकथेकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर यांना, ललित गद्याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, विनोदाकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना, चरित्राकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, आत्मचरित्रासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा. राठोड यांना, समीक्षा, संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला व आस्वादपर लेखनाकरिता श्री. के. क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रौढ वाङ्मय राज्यशास्त्र अथवा समाजशास्त्रकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही.

प्रौढ वाङ्मय इतिहास

शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र अथवा व्याकरणाकरिता नरहर कुरुंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञानाकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, तसेच उपेक्षितांचे साहित्यकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना जाहीर झाला आहे.

अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखनाकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस नाही. तत्त्वज्ञान व मानसशास्त्रकरिता ना. गो. नांदापूरकर पुरस्कार हा या. रा. जाधव यांना, शिक्षणशास्त्रकरिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरणकरिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित अथवा आधारितसाठी रा. ना. चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादाकरिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरुण पाठक यांना तर संकीर्णकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे.

बाल वाङ्मयमध्ये कवितेकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना, नाटक व एकांकिकाकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरुजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना सर्वसामान्य ज्ञानकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङ्मय संकीर्ण या प्रकारातील ना.धों.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ. आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आहे.

प्रथम प्रकाशनअंतर्गत काव्याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिकाकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री. ना. पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग. ल. ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्याचा ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये असे आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा. भा. पाटणकर पुरस्काराकरिता शिफारस नाही.

याचप्रमाणे सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना ‘आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award ceremony in mumbai on the occasion of marathi language pride day mumbai news amy