मुंबई : प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी ऐनवेळी घोषणा करून जम्बोब्लॉक घेण्यास विरोध केल्यानंतरही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने ३६ तासांचा ब्लॉक घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत हा ब्लॉक असेल. यामुळे तीन दिवस प्रवाशांचे अतोनात हाल होणार असून ठाण्यातील ६३ तासांच्या ब्लॉकमुळे गैरसोयींत भर पडणार आहे.

सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० आणि ११ फलाटांची लांबी वाढविण्यासाठी इंटरलॉकिंगची कामे सुरू आहेत. ही कामे ३६ तासांत पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धिम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. अनेक लोकल भायखळ्याऐवजी दादर, परळपर्यंत चालवण्यात येतील. शेकडो लोकल रद्द आणि अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे ठाणे येथील ५-६ फलाटांच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सुरू झालेला ब्लॉक रविवारी दुपारी १२.३० पर्यंत असेल. या ब्लॉकमुळे शुक्रवारी १६१ लोकल फेऱ्या पूर्ण तर ७ लोकल अंशत: बंद करण्यात आल्या. मात्र यापुढे कल्याण ते सीएसएमटीदरम्यान किती लोकल रद्द करण्यात येणार तसेच गर्दीच्या वेळी कोणत्या लोकल रद्द असतील, याची माहिती देण्यास मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने टाळाटाळ केली. ठाणे येथील ब्लॉककाळात कर्जत, कसारा अप आणि डाऊन मार्गावरील एकही लोकल फेरी रद्द न करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा >>> आज सीएसएमटी ते दादर, वडाळा लोकल बंद

दरम्यान, दीर्घकालीन ब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ असून मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ब्लॉकची आधी काही दिवस कल्पना देणे आवश्यक असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शेकडो लोकल रद्द होणार असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला आणि मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी आयत्यावेळी माध्यमांना माहिती दिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ऐनवेळी सरकारी, खासगी कंपन्यांमधील नोकरदारांना त्वरित सुट्टी किंवा घरून काम करण्याची मुभा कशी मिळेल, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा ब्लॉक रद्द करून पुन्हा नियोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन केले. प्रवासी आणि प्रवासी संघटनांना विचारात न घेता मध्य रेल्वेने मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचा आरोप

संघटनेचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केला. तर ब्लॉक काळातील गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी नोकरदार वर्गाच्या कामाच्या वेळा शिथिल कराव्यात, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या अॅड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.

आधीपासूनच विलंब

सीएसएमटी व ठाण्याचे ब्लॉक सुरू होण्याआधी लोकल विलंबाने धावत होत्या. गुरुवारी सकाळपासून लोकल १५ ते ३० मिनिटे उशिराने धावल्या. तसेच, बुधवारी रात्रीही प्रवाशांना पाऊण तास उशीर होत होता. गुरुवारी लोकलचा लेटलतिफ कारभार सुरू असल्याने सीएसएमटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपरसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी जमली होती.