शिवेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहटीत एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. यानंतर महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी गुवाहटीतील या आमदारांना बहुमत सिद्ध करायला मुंबईतच यावं लागेल, असं म्हणत इशारे दिले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट करत नाव न घेता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वाघ आणि मांजरीचा एडिट केलेला एक फोटो पोस्ट केलाय. तसेच हा फोटो शेअर करताना त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीवरून टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो. माझं ‘मॅव मॅव’ ऐकून थांबा बररर का!”

नितेश राणे यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. राणे समर्थक त्यांच्या या पोस्टचं कौतुक करत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत, तर ठाकरे समर्थक नितेश राणे यांच्यावरच हल्लाबोल करत आहेत.

शिंदे यांच्यासह १६ जणांना अपात्रतेची नोटीस

दरम्यान, पक्षादेश बजावूनही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेने केलेल्या अर्जानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वाना सोमवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे शिवसेना व शिंदे गटात आता कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला.

शिंदे यांनी बंड पुकारल्यावर शिवसेना विधमंडळ पक्षांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश लागू केला होता. या बैठकीला उपस्थित नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरवावे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा बजाविल्या आहेत.

विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या स्वाक्षरीने नोटीस या १६ आमदारांना बजाविली आहे. आपल्याला अपात्र ठरविण्याकरिता शिवसेना प्रतोदाने अर्ज केला आहे. यानुसार हे समन्स बजाविण्यात येत असल्याचा उल्लेख त्यात आहे. आपले बचावात्मक लेखी म्हणणे कागदपत्रांसह सोमवारी सायंकाळी ५.३० पर्यंत विधानसभा उपाध्यक्षांकडे सादर करावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. उपरोक्त मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर आपल्याला काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून अर्जावर निर्णय घेतला जाईल, असेही शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या अर्जावर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस बजाविल्याने शिंदे गटाला भूमिका घ्यावी लागेल. शिंदे गटाने आम्ही शिवसेनेत असून, आमचाच गट हा खरा शिवसेना पक्ष असल्याचा पवित्रा घेतला आहे.

नोटीस बजाविण्यात आलेले आमदार कोण?

एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संदीपन भूमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, लता सोनावणे, चिमणराव पाटील, रमेश बोरनारे, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane facebook post on worli assembly aaditya thackeray pbs
First published on: 26-06-2022 at 11:03 IST