जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) काही मातब्बरांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर, शरद पवार आणि अजित पवार दोघांचे खंदे समर्थक मानले जाणारे अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात, काही दिवसातच महायुतीच्या मंत्र्यांसमवेत कार्यक्रमात उपस्थित राहुन त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अमळनेर तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यावेळी अजित पवार गटाचे नेते तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील उपस्थित होते. त्या ठिकाणी आवर्जून हजेरी लावत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगावमधील राष्ट्रवादीच्या (शरद पवार) मेळाव्याला हजेरी लावून माजी आमदार पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अमळनेरची उमेदवारी मागितली होती. प्रत्यक्षात अमळनेरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला होता. दरम्यान, निवडणूक प्रचारावेळी अजित पवार यांनी स्वतः पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न अमळनेर दौऱ्यावर असताना केला होता. परंतु, माजी आमदार पाटील यांनी त्यांचीही भेट टाळली होती.

असे असताना, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील व दिलीप सोनवणे यांच्यासह बऱ्याच तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील आता काय भूमिका घेतात, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु, पाटील यांनी तटस्थ भूमिका घेत सर्वांना कोड्यात टाकले होते. आता त्यांनी महायुतीच्या मंत्र्यांसह आमदारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमास हजेरी लावत आपली भविष्यातील दिशा निश्चित केल्याचे मानले जात आहे.