-
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत असेही काही सेलिब्रिटीज होऊन गेले, ज्यांचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. तरीही ते या क्षेत्रात आले अन् लोकांनी हेराफेरीच्या बाबुराव आपटे स्टाइलमध्ये “उठा ले रे देवा” असं म्हणत त्यांच्या अभिनयाच्या प्रयत्नाकडे सपशेल पाठ फिरवली. त्यापैकी हिमेश रेशमियां यांचं नाव अग्रस्थानी येतं.
-
इंडस्ट्रीमध्ये हिमेश यांनी संगीतकार आणि गायक म्हणून स्वतःची अशी ओळख निर्माण केली, पण अभिनय क्षेत्रात येऊन मात्र त्यांनी लोकांचा रोषच ओढवून घेतला. आजवर हिमेश यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे, पण त्यापैकी एकाही चित्रपटातून प्रेक्षकांवर त्यांना छाप पाडता आलेली नाही. असाच एक केविलवाणा प्रयत्न पुन्हा करत हिमेश लवकरच प्रेक्षकांसाठी ‘बॅडअॅस रवी कुमार’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत.
-
रघु राम आणि राजीव लक्ष्मण ही जोडगोळी ‘रोडीज’ या शोमुळे प्रसिद्ध झाली, तरुण यांना फॉलो करू लागले, पण ‘तीस मार खान’ या चित्रपटात काम करून त्यांनी आजवर केवळ ट्रोलिंगचं सहन केलेलं आहे. त्यांचा हा अभिनयाचा प्रयत्न प्रेक्षकांनी हाणून पाडला.
-
बॉक्सिंग रिंगमध्ये समोरच्याला आस्मान दाखवणारा लोकप्रिय बॉक्सर विजेंदर सिंगला मात्र अभिनयाच्या रिंगणात प्रेक्षकांनी उताणा पाडलं. ‘फग्ली’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदा आणि शेवटचा अभिनय केला.
-
आपल्या मधुर आवाजाने करोडो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनू निगमलाही एकेकाळी अभिनयात नशीब आजमावायचं होतं. ‘जानी दुश्मन’ या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून प्रेक्षकांनी सोनूची गाणी ऐकणंच पसंत केलं, त्यालाही ते लगेच ध्यानात आलं आणि पुन्हा त्याने अभिनयाचा कधीच विचार केला नाही.
-
क्रिकेटविश्वातील ग्लॅमर ज्याला मिळालं आणि मॅच फिक्सिंगमध्ये ज्याचं नाव आलं अशा क्रिकेटपटू अजय जडेजालाही चित्रपटात अभिनय करायचा मोह आवरता आला नाही. ‘खेल’ या चित्रपटातून त्याचा अभिनयाचा डाव कायमचा संपला.
-
आमिर खानचा भाऊ असूनही फैजल खानला ‘मेला’ या चित्रपटावरच समाधान मानावं लागलं. यापुढे त्याला सहन करणं प्रेक्षकांच्या सहनशक्तीपलीकडचं होतं. मध्यंतरी त्याने आमिर खानवर बरेच आरोपही केले, पण तेदेखील त्याच्या अभिनयाप्रमाणेच अगदीच फुटकळ होते.
-
रॅपविश्वातील लोकप्रिय नाव हनी सिंगने हिमेश रेशमियां यांच्या चित्रपटात अभिनयाचा प्रयत्न केला, पण हिमेस रेशमियांप्रमाणेच हनी सिंगलाही प्रेक्षक सहन करू शकले नाहीत.
-
आज स्वतःच्या समीक्षणातून बॉलिवूडमधील बड्या बड्या लोकांच्या चित्रपटांना हाणून पाडणाऱ्या ‘केआरके’ म्हणजेच कमाल आर खाननेही एकेकाळी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं होतं. केआरकेला तेव्हाही अभिनेता म्हणून कुणी गांभीर्याने घेतलं नाही आणि समीक्षक म्हणून त्याला आजही तितक्या गांभीर्याने घेतलं जात नाही. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पार्थ पवारांच्या कंपनीचं गौडबंगाल ! चार वर्षांत कमावलेलं उत्पन्न अखेर आलं समोर