-
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक अशी श्रीदेवींची ओळख आहे. त्यांचे पती बॉलीवूडचे निर्माते बोनी कपूरदेखील अनेकदा त्यांच्याविषयी वक्तव्य करतात. ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत, त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात.
-
आता बोनी कपूर यांनी नुकतीच कोमल नहाटा यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “श्रीदेवीला हिंदी येत नव्हती. बॉलीवूडमधील तिचे पाच-सहा चित्रपट हे डब केले गेले होते. पण, तिला वाटले की, भाषेमुळे तिच्या अभिनयावरही परिणाम होत आहे.
-
तिची भूमिका परिणामकारक रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ती हिंदी शिकली. डबिंग थिएटरमध्ये तिच्याबरोबर तिची हिंदीची शिक्षिका असायची. तिने स्वत:च चित्रपट हिंदीमध्ये डब करायला सुरुवात केली. मॉम हा चित्रपट तिने मल्याळम, तेलुगू व तमीळमध्ये डब केला आहे. असे समर्पण खूप कमी लोकांमध्ये असते.”
-
“‘मॉम’ चित्रपटात ए. आर. रहमानची गाणी असावीत आणि त्याचे तितके मानधन देता यावे यासाठी श्रीदेवींनी स्वत:चे मानधन कमी केले होते, असाही खुलासा बोनी कपूर यांनी केला. ‘मॉम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, आम्हाला ए. आर. रेहमानला घ्यायचे होते; पण त्याचे मानधन खूप होते.
-
“ते मानधन आम्हाला परवडणारे नव्हते. आम्ही श्रीदेवीच्या मानधनासाठी काही रक्कम बाजूला ठेवली होती. ते ५०-७० लाखांदरम्यान होते. पण तिने आम्हाला सांगितले की, राहिलेले मानधन मला देऊ नका. त्याऐवजी ए. आर. रेहमानचे मानधन त्या पैशातून द्या.”
-
‘मॉम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवींनी बोनी कपूर यांच्याबरोबर एका खोलीत राहण्यास नकार दिला होता.
-
त्याचे कारण सांगत बोनी कपूर म्हणाले, “चित्रपटाचे बहुतेक शूटिंग आम्ही उत्तर प्रदेशातील नोएडा येथे केले. नंतर आम्ही जॉर्जियामध्ये शूट केले. परंतु, त्या काळात मी आणि तिने कधीही खोली शेअर केली नाही.”
-
“तिने मला सांगितले होते की, मला विचलित व्हायचे नाही. ती त्या पात्राशी इतकी समर्पित झाली होती की, खऱ्या आयुष्यात पत्नीच्या भूमिकेचा त्या पात्रावर तिला परिणाम होऊ द्यायचा नव्हता. चित्रपटातील आईच्या भूमिकेतच तिला राहायचे होते”, असे सांगत श्रीदेवी त्यांच्या कामाप्रति अत्यंत समर्पित होत्या, असे बोनी कपूर यांनी सांगितले.
-
दरम्यान, श्रीदेवींचे २०१८ साली निधन झाले. आता त्यांच्या मुली जान्हवी कपूर व खुशी कपूर चित्रपटात काम करताना दिसत आहेत. (सर्व फोटो सौजन्य: श्रीदेवी इन्स्टाग्राम)

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?