-
सुपरड्रिंक माचा टी : जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
आज आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये माचा टी ही एक खास पसंती ठरते आहे. ग्रीन टीसारखी दिसणारी ही माचा टी केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. शरीराला ऊर्जावान ठेवण्यापासून ते डिटॉक्स करण्यापर्यंत, माचा टीचे अनेक जबरदस्त फायदे आहेत. काय आहे ही माचा टी आणि ती इतकी खास का आहे, हे जाणून घ्या.. -
माचा टी म्हणजे काय?
माचा टी हा ग्रीन टीचाच एक खास प्रकार आहे, जो कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून तयार होतो; पण याची पद्धत थोडी वेगळी असते. माचा झाडं सावलीत वाढवली जातात. त्यामुळे त्याचा हिरवागार रंग, चव व पोषक घटक अधिक वाढतात. सावलीमुळे त्यात क्लोरोफिलचं प्रमाणही जास्त असतं, ज्यामुळे तो नेहमीच्या ग्रीन टीपेक्षा जास्त उजळ दिसतो. -
माचा टी ग्रीन टीपेक्षा वेगळी कशी?
माचाची पाने वाफवून, वाळवून आणि नंतर अगदी बारीक पावडर बनवली जाते. ही पावडर थेट पाण्यात मिसळून प्यायली जाते, त्यामुळे सगळी पोषण मूल्यं शरीरात जातात. ग्रीन टी मात्र पानं उकळून फक्त त्याचा अर्क प्यावा लागतो. माचामध्ये एल-थियानाइन नावाचं अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे त्याला खास ‘उमामी’ चव येते. त्यामुळे पाच पारंपरिक चवींव्यतिरिक्त एक वेगळीच अनुभूती देते. -
अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर स्रोत
माचा टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स दूर करतात आणि पेशींवर होणारे नुकसान कमी करतात. त्यामुळे त्वचा, मेंदू आणि संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी माचा टी उपयोगी ठरते. -
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
माचा चहा चयापचय (मेटॅबॉलिझम) वाढवतो आणि चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान करतो. त्यामुळे शरीराची ऊर्जा जास्त खर्च होते आणि चरबी कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. -
यकृतासाठी (Liver) रक्षणकर्ताच!
माचा टी यकृताची कार्यक्षमता सुधारतो आणि त्याचे संरक्षण करतो. विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि फॅटी लिव्हरसारख्या आजारांपासून बचाव करतो. त्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते. -
कर्करोगापासून संरक्षण
माचामध्ये EGCG आणि पॉलीफेनॉलसारखी शक्तिशाली अँटी-कॅन्सर संयुगे असतात. ही संयुगे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यास मदत करतात. अजून संशोधन सुरू असले तरी सुरुवातीचे परिणाम सकारात्मक आहेत. -
त्वचेला नैसर्गिक चमक
माचा टीमधील कॅटेचिन्स त्वचा उजळवतात आणि कोलेजनची पातळी सुधारतात. त्यामुळे त्वचा आतून व बाहेरून अशा दोन्ही प्रकारे तजेलदार, मऊ व निरोगी राहते. -
मेंदू अधिक सक्रिय ठेवतो
माचातील एल-थियानिन आणि थोड्या प्रमाणातील कॅफिन यांमुळे मेंदूचे कार्य सुधारते. त्यामुळे लक्ष केंद्रित होणं, स्मरणशक्ती आणि मानसिक तणाव न वाढवता, विचार करण्याची क्षमता वाढते. -
हृदयासाठी फायदेशीर पेय
माचा टी वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची (HDL) पातळी वाढवतो. तो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो. त्यातील फ्लेवोनॉइड्समुळे जळजळ कमी होऊन, दातांचेही संरक्षण होते.

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”