-
सध्या सीएए आणि एनआरसीच्या मुद्दय़ावर देशातील वेगवेगळ्या भागांत अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध निदर्शने आणि आंदोलने करत आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा. सार्वजनिक पैशांतून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यवस्थेवर भाष्य करणं योग्य नाही’, अशी प्रतिक्रिया काही राजकीय नेते व्यक्त करत आहेत. वास्तविक, विद्यार्थिदशेत असताना वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला, आंदोलनं केली आणि पुढे राजकारणात सक्रिय झाले अशी कितीतरी नावं सांगता येतील. अशा काही महत्त्वाच्या नेत्यांबद्दल.. (संकलन – अर्जुन नलवडे) (सौजन्य: लोकप्रभा)
-
-
एम् वेंकय्या नायडू (भारतीय जनता पार्टी) – देशाच्या उपराष्ट्रपती पदावर विराजमान असणाऱ्या एम. वेंकय्या नायडू या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची जडणघडण विद्यार्थी चळवळीतूनच झाली आहे.‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’मधून त्यांनी आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केली. विद्यार्थिदशेत त्यांनी ‘जय आंध्रा आंदोलना’मध्ये भाग घेतला. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी उभारलेल्या ‘भ्रष्टाचार मुक्ती अभियाना’मध्ये पुढाकार घेऊन त्यांनी ‘छात्र युवा संघर्ष समिती’चे संयोजन केलं होतं, त्यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांची नजर नायडू यांच्यावर पडली. इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीविरुद्ध विद्यार्थी म्हणून त्यांनी आवाज उठवला. आपल्या वक्ृतत्वाच्या जोरावर तत्कालीन सरकारला धारेवर धरलं. त्यासाठी त्यांना साडेसात महिन्यांची शिक्षा झाली होती. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाचे प्रश्न इतक्या ठामपणे मांडले की, लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. केंद्रातील विविध महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
-
सीताराम येचुरी (मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी) – १९७४ साली पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठमध्ये शिकत असताना सीताराम येचुरी यांनी मार्क्सववादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) सदस्यत्व स्वीकारले. १९७५ मध्ये येचुरी मार्क्सिवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाले, तेव्हा ते जेएनयूमध्ये विद्यार्थीच होते. दरम्यान ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असताना १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली. तेव्हा त्यांनी आणीबाणीविरोधात विद्यार्थ्यांंना एकत्र करून आंदोलने घडवून आणली, त्यामुळे त्यांना तेव्हा अनेकदा अटक झाली होती. १९७७ साली आणीबाणी शिथील झाली अन् त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. त्या जोरावरच ते जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तीन वेळा निवडून आले. त्यानंतर ते एसएफआयचे सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष म्हणूनही निवडून आले. २००५ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर काम केले.
-
-
गुरुदास कामत (काँग्रेस पक्ष) – ऑगस्ट २०१८ मध्ये दिवंगत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत हे विद्यार्थी चळवळीतूनच सक्रिय राजकारणात पुढे आलेले होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७२ सालामध्ये विद्यार्थी चळवळीतून झाली. १९७६ मध्ये ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणून कामत यांची निवड करण्यात आली. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना कामत विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले. त्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर त्यांनी भारतीय यूथ काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांनी चळवळ आणि यूथ काँग्रेसमध्ये केलेल्या कामाला राजकीय ओळख मिळू लागली. त्याच्या जोरावर ते खासदार झाले. कामत यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले होते. तसेच केंद्रात आणि राज्यातही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल