-
सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपदाचे पडसाद बुधवारी पुन्हा एकदा विधानसभेत उमटले. दरम्यान यावेळी सभागृहात नेहमी शांत असणारे जयंत पाटील चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.
-
कामकाज सोडून विरोधक चित्रपट बघायला गेल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपावर ‘होय, मी काल चित्रपट बघायला गेलो होतो’, असे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
-
त्यावर १७ कोटींचा चित्रपट काढून १५० कोटी कमावणाऱ्या दिग्दर्शकाला काश्मिरातील पंडितांच्या घरांसाठी काही पैसे द्यायला सांगा, अशी कोपरखळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगावली.
-
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपताच फडणवीस यांनी विधिमंडळातील कामकाज प्रक्रियेबाबतचा मुद्दा उपस्थित केला. गेले तीन दिवस मागण्यांवर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला समसमान वेळ देणे अपेक्षित असतानाही सत्ताधारी पक्षाला जास्त वेळ दिला जात असून विरोधकांना डावलले जात असल्याचा आक्षेप फडणवीस यांनी घेतला.
-
जवळपास ७ तासांच्या चर्चेत विरोधी पक्षाला केवळ २ तास ४० मिनिटे इतकाच वेळ मिळाला. विरोधक आणि सत्ताधारी यांना समान वेळ मिळायला हवा अशी मागणी फडणवीस यांनी केली.
-
त्यांच्या या आक्षेपावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी, ही वेळ कुणी आणली, काँग्रेस सदस्य बोललेच नाहीत असा दावा करीत फडणवीस यांनी दिलेली आकडेवारी खरी आहे का, त्यांनी आकडेवारी मनानेच आणली नाही ना असा टोला लगावला.
-
त्यावर सत्ताधारी बाकावरून विरोधी पक्षनेते काल पिक्चर बघायला गेले होते, कसा होता पिक्चर अशी फडणवीस यांची फिरकी घेण्यात आली. मागण्यांवरील चर्चेत डावलल्याने नाराज झालेल्या फडणवीस यांना सत्ताधाऱ्यांकडून डिचवले जाताच, होय मी काल बाहेर पिक्चर बघायला गेले होतो, असे सडतोड उत्तर फडणवीस यांनी दिले.
-
त्यांनंतर जयंत पाटील हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते.
-
“काश्मीर फाईल्स हा सिनेमा मध्यांतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरं बांधण्यासाठी दान करायला सांगा,” अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
-
‘काश्मीर फाईल्स’ वर जयंत पाटील बोलत असतानाच भाजपा आमदार योगेश सागर खाली बसून जोरजोरात बोलून व्यत्यय करत असल्याचं लक्षात येताच जयंत पाटील संतापले.
-
प्रत्येक वेळी बोललं पाहिजे ही काय पद्धत आहे. आम्ही ते बोलत असताना मधे बोलतो का अशा शब्दात जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला.
-
विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या सदस्यांना समज द्यावी असं यावेळी ते फडणवीसांकडे हात दाखवत म्हणाले.
-
“खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा. आम्हालाही खाली बसून बोलता येतं. त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका,” असे खडे बोल जयंत पाटील यांनी सुनावले.
-
यामुळे ‘काश्मीर फाईल्स’वरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस व भाजपा सदस्य अशी खडाजंगी सभागृहात पहायला मिळाली.
-
(Photos: Twitter/Video Screenshot)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला