-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून पुढील तीन दिवस राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
-
मात्र याच दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं आहे.
-
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असून विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्यामध्ये पावसाचा आणि पूराचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी देत असल्याचा संदर्भही शरद पवार यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
-
मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. “पंचनामे झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याऐवजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतायत हा विरोधाभास नाही का वाटत?” असं पवार यांना विचारण्यात आलं.
-
यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, “राज्यकर्त्यांनी प्राधान्य कशाला द्यावं हे महत्वाचं आहे,” असं म्हटलं.
-
“राज्यकर्त्यांनी संकटग्रस्त लोकांच्या वेदना जाणून घेण्याची आवश्यकता आहे. पण आपल्या राज्यकर्त्यांना दुसरीच प्रायोरिटी वाटते. त्यांना योग्य वाटतंय त्या दृष्टीने ते चालले आहेत,” असं टोलाही पवारांनी.
-
“जे आमदार त्यांच्या गटात गेलेत त्या मतदारसंघांमध्ये जात आहेत,” असं म्हणत पत्रकाराने शरद पवारांना एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावरुन प्रश्न विचारला.
-
या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, “मुख्यमंत्री दौऱ्यावर निघतात ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी कुठं जायचंय हा निर्णय त्यांनी घ्यायचाय,” असं म्हटलं.
-
पुढे पवार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांमध्ये दौरे करत असल्याचा संदर्भ दिला.
-
“आज विरोधी पक्षनेत्यांनी दौरा काढला तो ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्या भागात काढलाय. लोक संकटात असलेल्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी दौरे काढलेले आहेत,” असं शरद पवार म्हणाले.
-
“स्वागतासाठी सत्कारासाठी विरोधीपक्ष नेत्यांचे दौरे दिसत नाहीत. याच्यातून कोणी काय बोध घ्यायचा असला तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे,” असा खोचक टोला पवारांनी एकनाथ शिंदेंचा थेट उल्लेख न करता लगावला.
-
एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
-
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच महाराष्ट्र दौऱा आहे.
-
आता दौरा सुरु होम्याआधीच पवारांनी केलेल्या या टीकेला शिंदे गटाकडून काही उत्तर येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
पत्रकारांनी शरद पवारांना, “संजय राऊत म्हणतायत की हे सरकार पुन्हा पडेल. फार काही भवितव्य वाटत नाहीय या सरकारचं,” असं विचारलं.
-
या संदर्भात शरद पवार यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.
-
तसेच पुढे बोलताना, “संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करु?” असंही पवार म्हणाले.
