-
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.
-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांना अनुक्रमे मशाल आणि ढाल-तलवार ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील या संघर्षावर थेट भाष्य केले.
-
त्यांनी न्यायालयातील खटले, शिवसेनेतील बंडखोरी, महाविकास आघाडी यावर बोलताना शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केले. मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
-
छगन भुजबळ यांचा त्यांच्या पहिल्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांचे निवडणूक लढवण्याचे वयच नव्हते. तरीदेखील त्यांनी निवडणूक लढवली होती.
-
ते जिंकले असते तर काय करायचे हा कायदेशीर प्रश्न उभा राहिला असता. आयुष्यातील पहिल्या निवडणुकीतही पराभूत होऊन त्यांनी जे करायचं ते करून दाखवलं.
-
छगन भुजबळ बेळगावमध्ये गेले होते. ती तर कमालच होती. तो फोटो आज कोणी पाहिला तर हिंदुत्व सोडल्याचे माझ्यावर आरोप होतील. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले.
-
अशा लोकांच्या वाढदिवशी कौतुक करायला गेले, असा माझ्यावर आरोप होईल, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.
-
आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत आहे. दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून न्यायालयात जावे लागले.
-
हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या. माझी तयारी आहे. दोघे एकाच व्यासपीठावर एकाच मैदानावर येऊ. मग जी लढाई व्हायची ती होऊ द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.
-
शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली होती. मात्र शरद पवार, काँग्रेस यांच्या रुपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
छगन भुजबळ यांची ही पहिलीच पंचाहत्तरी आहे. पुढच्या पंचाहत्तरीलाही सोबतच राहा. आम्हाला कार्यक्रमाला बोलवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
तसेच महाविकास आघाडीची सत्ता ही तुमच्या हातात आहे. नेत्याचा जयजयकार करून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी सोबत यावे लागेल. ही लाढाई माझ्या एकट्याची नसून सर्वांचीच आहे. ही लाढाई देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे.
-
अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले. महाविकास आघाडीच्या रुपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते.
-
मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. (सर्व फोटो- ट्विटर, फेसबुक)
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”