-
महाराष्ट्रामधील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. याच निकालासंदर्भात बोलता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना फैलावर घेतल्याचं चित्र अकोल्यामध्ये पहायला मिळालं.
-
झालं असं की , १ हजार १६५ पैकी ४७१ ग्रामपंचायतींचा निकाल दुपारी दीडपर्यंत हाती आला होता. त्यामध्ये १०१ जागांवरवर भाजपा, ५९ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गट विजयी झाला.
-
तर ६१ ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गटाने, काँग्रेसने ६२ तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळावल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत होतं.
-
यावरुनच अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता ही आकडेवारी धादांत खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
-
“मी तुम्हाला सांगू का हे सगळं तुम्ही धादांत खोटं बोलत असता. मागच्या वेळेसही तुम्ही असं सांगितलं. प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नसते. आमदारकीची निवडणूक चिन्हावर होते. खासदारकीची निवडणूक चिन्हावर होते. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायती या चिन्हावर होतात. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चिन्हावर होत नाहीत,” असं अजित पवार म्हणाले.
-
“चिन्हावर निवडणूक होत नसताना तुम्हाला कसं कळलं की हा कुठल्या पक्षाचा आहे?” असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी पत्रकाराला विचारला.
-
“माझं तर म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना चिन्हाचं वाटप होतं. तर ग्रामपंचायतीला पण चिन्हावर निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे स्पष्ट चित्र कळेल,” असंही अजित पवार म्हणाले.
-
“आम्ही पण म्हणतो आमच्या जास्त आल्या. भाजपा म्हणजे आमच्या जास्त जागा आल्या. शिवसेना म्हणते आमच्या जास्त जागा आल्या. काँग्रेस म्हणते आमच्या जास्त आल्या. तुम्ही मिडियावाले कसं चालवता तुमचं तुम्हाला माहिती,” असा टोला अजित पवारांनी लगावला.
-
“ते त्या पक्षाला मानणारे असतात” असं म्हणत पत्रकाराने अजित पवारांना उत्तर दिलं.
-
हे ऐकून अजित पवार यांनी थेट स्वत:च्या राजकीय कारकिर्दीचाच उल्लेख करत पत्रकाराला सुनावलं.
-
“अजिबात असं नाहीय. ३२ वर्षे झाली मी राजकारण, समाजकारण करतोय,” असं चढ्या आवाजात म्हणत ग्रामपंचायतींमध्ये मतदान हे पक्ष पाहून नाही तर उमेदवारांच्या आधारे होत असल्याचं सूचक विधान अजित पवारांनी केलं.
