-
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं.
-
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी हा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या शरद पवारांच्या भाषणातील १० मुद्दे जाणून घेणार आहोत.
-
शरद पवार म्हणाले, “१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला, हा प्रवास गेली ६३ वर्षे अविरत सुरू आहे.”
-
“त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्ष शिल्लक आहेत.”
-
“या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालणाऱ्यावर माझा भर असेल,” असं शरद पवार म्हणाले.
-
“सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“तथापि, शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच, युवक, युवती यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटनांच्या प्रश्नांकडे माझं लक्ष राहिल,” असं शरद पवारांनी म्हटलं.
-
“गेल्या ६० वर्षात महाराष्ट्र आणि आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिलं, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे संघटनेच्या संदर्भातील पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटतं. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी, असं सूचित करू इच्छितो.”
-
“त्यात प्रफूल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटी, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड आणि इतर काही जणांचा समावेश आहे,” असं शरद पवार म्हणाले.
-
“ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईन. तसेच, पक्ष संघटनावाढ, पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवणं, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल, असा विश्वास व्यक्त करतो,” असं शरद पवारांनी म्हटलं.
-
“मी अध्यक्षपदावरून निवृत्त होत असलो तरीही, माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करत आलो आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही.”
-
“उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेचे अडीअडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल,” असेही शरद पवारांनी नमूद केलं. ( छायाचित्र सौजन्य – गणेश शिरसेकर ( इंडियन एक्स्प्रेस ), संग्रहित )

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत