-
भाजपा हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनत करून भाजपा वाढवला. पण, आता बाजरबुणगे येत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनी माखलेल्यांना भाजपात घेतलं जात आहे. त्यांच्या सतरंज्या घालण्याचं काम भाजपाचे निष्ठावंत अंधभक्त करत आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते यवतमाळमधील दिग्रस येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये जाऊन प्रचार करतात. पण, मणिपूरमधील परिस्थिती भयानक आहे. देशातील एक मणिपूर ‘मणी’ हा तुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये जाण्याचं सोडा, त्याबद्दल बोलण्यासही तयार नाहीत.”
-
“मणिपूर शांत करायचा असेल, तर उपाय सांगतो. तुम्ही अन्य पक्षातील लोकांवर भ्रष्टाचारी म्हणून आरोप करता. त्यांच्या कुटुंबाची निंदानालस्ती करता. घरावर धाडी टाकण्यात येतात. गरीब झोपडीत राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी आणि इन्कम टॅक्स पाठवता. तुमच्या अधिकाऱ्यांत हिंमत असेल, तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला मणिपूरला पाठवा. आरोप केल्यानंतर सगळे तुमच्यासमोर शेपूट *****न येतात. तसे, मणिपूर पेटवणारे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीतीने तुमच्या पक्षात आले, तर मणिपूर शांत होऊन जाईल,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.
-
“आमदार, खासदार गेले तरी दमदार शिवसैनिक माझ्याबरोबर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवीला आलो होतो. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा पोहरादेवीच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी दिला. मला वाटलं बांधकाम वेळ लागेल. येथील रस्तेही निट नाही. मग निधी गेला कुठे? का त्यातूनही हफ्ता खाण्यात आला? याची चौकशी कोण करणार?” असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.
-
“यवतमाळमधील आमदार आणि खासदार दोघांवर आरोप झाले. आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या. पण, एकदिवशी फोटो आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मात्र, अख्ख्या देशात तुमच्याच पक्षातील काही दलालांनी आरोप होते की, या खासदार भ्रष्ट आहेत. त्यांच्याच हातून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. पुढे चौकशीचं काय झालं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.
-
“आज मी एकटा आहे, असं भाजपाला वाटतं. पण, बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या मनातून काढू शकणार नाही. राजकारणात फोडाफोडी होत असते. छगन भुजबळ आपल्यात होते नंतर राष्ट्रवादीत गेले. आता तिकडे गेले आहेत. पण, पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आली आहे. ती संपवण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
-
“विरोधकांनी जाहीर सभेत आमच्यावर बोलवं, आम्ही तुमच्यावर बोलतो. जनता ठरवेल ते मान्य करायचं, याला म्हणतात लोकशाही. मात्र, आता तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझेच येणार, असं चाललं आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
-
“आपल्याकडील ४० जण आमदार भाजपाकडे गेले आहेत. अपक्षांचाही त्यात समावेश आहे. १६० की १६५ जणांचं मजबूत सरकार आहे. तर, पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? अमित शाहांबरोबर अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद असं ठरलं होतं. शिवसेनेचा मुख्यमंत्री तेव्हाही करायचा होता. आता, पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
-
“समान नागरी कायदा काय आहे, हे लोकांना एकदा कळू दे. ‘एक देश, एक कायदा’ आम्हाला मान्य आहे. पण, ‘एक देश, एक पक्ष’ आम्हाला कदापि मान्य नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाला ठणकावलं आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी