-
सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशभरात खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे सदर वकिलाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
-
काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हिंदू देवतेच्या मूर्तीबद्दल केलेली टिप्पणी न आवडल्यामुळे सदर वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाीह, अशा स्वरुपाची घोषणाबाजीही केली.
-
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेत असलेल्या विष्णूच्या मूर्तीची पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश म्हणाले, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे.”
-
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे,” असे खंडपीठाने नमूद केले.
-
भूषण गवई यांची कारकिर्द?
भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत आर. एस. गवई यांचे ते पुत्र आहेत. -
न्यायमूर्ती गवई १६ मार्च १९८५ रोजी बार कौन्सिलमध्ये सामील झाले आणि १९८७ पर्यंत माजी महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केले. १९९० नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्यात प्रॅक्टिस केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील देखील होते.
-
ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती गवई यांची सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १७ जानेवारी २००० पासून ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
-
मे २०१९ रोजी न्यायमूर्ती गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. न्यायमूर्ती गवई हे अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा भाग राहिले आहेत. जानेवारी २०२३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदीवरील निकालाच्या खंडपीठाचा ते भाग होते.
-
न्यायमूर्ती भूषण गवई बौद्ध समाजातून सर्वोच्च पदावर पोहोचलेले ते दुसरे न्यायमूर्ती आहेत. तर पहिले सरन्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला. त्यांनी कोणताही गोंधळ न करता पुढील वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले, “त्यामुळे विचलित होऊ नका, आम्हीही झालो नाही.”

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य