-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन १ नोव्हेंबरच्या मोर्चासंबंधी सूचना दिल्या. १ तारखेला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
यावेळी त्यांनी माध्यमात त्यांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसंबंधी येत असलेल्या बातम्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आमची भेट झाल्यावर १० वी भेट, ११ वी भेट असा उल्लेख केला जातो.
-
“आम्हीच विसरलो कितीवेळा भेटलो ते. सोडून द्या ना आता. उठणं-बसणं तर आता होणारच आहे. ते चालू राहणार आहे. मोजताय कशाला? मलाच या बातम्यांचा कंटाळा आलाय, र लोकांना किती आला असेल”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
-
आज तुमच्यासाठी जादूचे प्रयोग आणले आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी ईव्हीएममधील मतचोरीबाबत सादरीकरण केले. ईव्हीएममध्ये हॅकिंग कसे केले जाते? याबाबत दोन व्यक्तींनी मनसेच्या मंचावर येऊन सादरीकरण केले.
-
राज ठाकरे म्हणाले, २०१७ पासून मी हे ओरडून ओरडून सांगत होतो. लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण हे जे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू झाले आहे, या भानगडींमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागतो.
-
राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत गडबड करून सत्तेमध्ये यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची. पाच वर्षं झाली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. यासाठी आणखी एक वर्ष लागले तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. एक वर्ष निवडणुका लांबल्याने काही फरक पडणार नाही.
-
“मतदार याद्या दुरुस्त केल्यानंतर कोणाचाही जय-पराजय झाला तरी तो आम्हाला मान्य असेल. मतदार याद्या दुरुस्त केल्यानंतर आज सत्तेत आहेत त्यांचा विजय झाला तरी तो आम्हाला मान्य असेल”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
-
एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र सरकार शिवनेरी, रायगड, राजगडावर नमो केंद्र स्थापन करणार आहे. जिथे फक्त आमच्या महाराजांचे नाव असले पाहिजे. तिथे हे आता पर्यटन केंद्र उभारले जाणार आहेत. हा शिंदेंच्या खात्याचा निर्णय आहे. -
पर्यटन केंद्र फोडून काढणार
पण मी आताच सांगतो. आमच्याकडे सत्ता असो वा नसो. वर नाही किंवा खाली, आजूबाजूला कुठेही सत्ता नसो. पण हे पर्यटन केंद्र उभे केले की, फोडून काढणार, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला. -
स्वतःला मुख्यमंत्री पद हवे म्हणून किती लाचारी करणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. “खाली काय चाटूगिरी चालू आहे, हे वर पंतप्रधान मोदींनाही माहीतही नसणार. सत्ता डोक्यात गेल्यामुळे आपण वाटेल ते करू, हा विचार येतो. मला मुख्यमंत्री केले पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मिळेल, ते मिळाले पाहिजे. यासाठी समोरच्याला खूश करण्यासाठी जे जे लागेल, ते दिले पाहिजे, ही यांची भूमिका आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
-
राज ठाकरे पुढे म्हणाले, सत्तेसाठी हे लोक काहीही करत आहेत आणि सत्ता येते ईव्हीएम मशीनमधून. त्यामुळे १ नोव्हेंबरचा मोर्चा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावे. जर बॉसने सुट्टी दिली नाही तर त्याला एक वाजवा आणि त्यालाही घेऊन या, असंही ते गमतीत म्हणाले.
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज