-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन घोटाळ्यासंदर्भात विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली. त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकारण तापले आहे.
-
या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना पार्थ पवारांची बाजू सावरून घेतली. पार्थ पवारचा यात काही संबंध नाही, जमीन खरेदी प्रकरणाचा खुलासा राज्य सरकारनेच केला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
तुम्ही पार्थ पवारची पाठराखण करत आहात का? असा प्रश्नही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, पार्थ, रोहित, जय, रेवती ही आमचीच मुले आहेत. ते काही चुकीचे करतील असे वाटत नाही.
-
आत्या सुप्रिया सुळेंनी पार्थची बाजू सावरली असली तरी अजित पवार यांनी या प्रकरणावरून व्यक्त केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
-
माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून हात झटकले. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. मी कधीही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काम करत नाही, असे अजित पवार म्हणाले.
-
जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीची नोंदणी तुमच्या पत्त्यावर आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, ते घर माझे नाही. तो पार्थ अजित पवारचा बंगला आहे. तसेच पार्थ सज्ञान असून मुले मोठी झाल्यानंतर त्यांचे त्यांचे निर्णय घेत असतात, असेही ते म्हणाले.
-
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारशी याबाबत बोलणे केल्याचे त्यांनी सांगितले. “पार्थला मी फोन केला होता. त्याने सांगितले की, आत्या मी काही चुकीचे केलेले नाही. माझी लिगल टीम यावर उत्तर देईल”, असे पार्थने सांगितले.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मघाशी कुणीतरी मला मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली. मी म्हणेण मुख्यमंत्र्यांनी जरूर या प्रकरणाची चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. त्यातील सत्यता पडताळून पाहणे, हे सरकारचे कामच आहे.
-
“तुमच्या आमच्या घरातील मुले सज्ञान होतात तेव्हा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यवहार करतात. पण यासाठी मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा माझा यात दुरान्वये संबंध नाही. मी संविधानाला माननारा आणि कायद्याने चालणारा आणि इतरांनीही कायद्याप्रमाणे वागावे, यासाठी प्रयत्न करणारा माणूस आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्या मी सविस्तर माहिती घेऊन यावर बोलेन”, असेही अजित पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल