-
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्षांत पदार्पण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत ब्रिटिश काळाची साक्ष देणारी एक खूण सापडली.
-
राज्याचा सर्वोच्च नागरिक असलेल्या राज्यपालांच्या सरकारी निवासस्थानी मलबार हिल येथील राजभवनात सापडलेली ही खूण म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातील एक बराक आहे.
-
१५० मीटर लांबीच्या या बराकीत १३ खोल्या असून ब्रिटिश सैनिकांचा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी या खोल्यांचा वापर होत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
-
बराकीचे उत्तम प्रकारे जतन करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव लवकरच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
-
राजभवनातून थेट बाहेर पडण्यासाठी एक भुयार असल्याची कल्पना एका ज्येष्ठ व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी राज्यपालांना दिली होती. त्यांनी या भुयाराचा शोध घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला शोध सुरू केला. यादरम्यान त्यांना पूर्वेकडे नव्याने उभारलेली भिंत पाडावी लागली. ही भिंत पाडल्यानंतर दिसलेल्या दृश्याने हे कर्मचारीही अवाक झाले.
-
भिंतीमागे १५० मीटर लांबीची आणि तब्बल पाच हजार चौरस फूट एवढी जागा असलेली बराक सापडली. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ही बराक मिळूनही ती होती तशीच सुस्थितीत असल्याचे आढळले.
-
बराकीत छोटय़ा-मोठय़ा आकाराच्या १३ खोल्या आढळल्या असून यातील काही खोल्यांच्या दरवाज्यांवर ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, ‘काट्र्रेज स्टोअर’, ‘शेल लिफ्ट’, ‘वर्कशॉप’ अशा पाटय़ाही आहेत.
-
ब्रिटिश काळात दारुगोळा साठवण्यासाठी या खंदकाचा वा बराकीचा वापर करत असावेत, असा अंदाजही व्यक्त होत आहे. या भुयाराच्या प्रवेशद्वारावर २० फुटी दरवाजा असून भुयारात हवा खेळती राहील आणि पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था आहे.
-
बराकीत जाण्यासाठी असलेल्या वाटेवर मशाली वा दिवे लावण्यासाठीही जागा आहे.
-
बराकीचे जतन करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत आता राज्यपाल इतिहासतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे राजभवनातून सांगण्यात आले.
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा