-
एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने ही मदत केली आहे. या मदतीनंतर भारतीय खेळाडू कुठे आहेत, ते मदतीसाठी का पुढे येत नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.
-
कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.
-
कमिन्सने केलेल्या या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर त्याचं ट्विट व्हायरल झालं असून ३८ हजार जणांनी ते रिट्विट केलं आहे. एक लाखांहून अधिक जणांनी ते लाईक केलं असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट करत कमिन्सने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. अनेकांनी कमिन्सकडून इतर खेळाडूंनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचबरोबर अनेकांनी भारतीय खेळाडूंनी मदत केली नसल्याचं म्हणतं त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या तसेच अनेक माजी खेळाडूंनाही मागील वर्षीच करोनासंदर्भातील सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. पुरुषच नाही तर महिला क्रिकेटपटुंनीही आपल्या राज्यांना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये मदत केलीय. कमिन्सने केलेल्या मदतीवरुन टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवरच जाणून घेऊयात नक्की कोणत्या खेळाडूने किती आर्थिक आणि इतर पद्धतीची मदत देशवासियांसाठी करोना काळात केलीय…
-
मिथाली राज > भारतीय महिला क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू असणाऱ्या मिथालीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपये आणि तेलंगणच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख असे एकूण दहा लाख रुपये दिल्याची माहिती मागील वर्षी ३० मार्च रोजी दिली होती.
-
रोहित शर्मा > मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणाऱ्या रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख रुपये मागील वर्षी दिले. तसेच त्याने महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे त्याने पाच लाख रुपये अन्नदान करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला तर पाच लाख कुत्र्यांबरोबर मुक्या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या संस्थेला दिले. त्याने एकूण ८० लाखांचा निधी करोना काळात दिला.
-
विराट कोहली > भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले. मात्र त्यांनी किती पैसे दिले यासंदर्भातील खुलासा केला नाही.
-
सचिन तेंडुलकर > भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुकलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला. यासंदर्भातील माहिती सचिननेच ट्विटरवरुन दिली होती.
-
काही दिवसापूर्वीचव आपल्या वाढदिवसानिमित्त सचिनने सोशल नेटवर्किंगवर एक फोटो पोस्ट करत आपण करोनावर यशस्वीरित्या मात केली असून लवकरच प्लाझमा डोनेशन करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याने करोनामुक्त झालेल्यांना प्लाझमा दान करण्याचं आवाहनही या व्हिडीओतून केलं.
-
सौरभ गांगुली > सचिनचा एकेकाळचा संघ सहकारी आणि सध्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरभने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५० लाखांचा निधी मागील वर्षी दिलेला. त्याचप्रमाणे त्याने गरजू लोकांना तांदूळ वाटप केलेलं.
-
सुरेश रैना > चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या रैनाने मागील वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती मात्र करोनासंदर्भातील मदत करण्यामध्ये तो मागे हटला नाही. रैनाने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ३१ लाख तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री निधीसाठी २१ लाख रुपये देण्याची घोषणा केलेली.
-
शिखर धवन > शिखर धवननेही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पैसे दिले होते. मात्र त्याने नक्की किती पैसे दिले याचा खुलासा केला नव्हता. त्याने संकट काळात इतरांनाही पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
-
अजिंक्य रहाणे > अजिंक्य रहाणेने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांचा निधी दिलेला. आपण केलेलं काम हे खूपच लहान असून मी केलेली मदत ही समुद्रातील एखाद्या थेंबाप्रमाणे असल्याचं रहाणे म्हणाला होता.
-
इरफान पठाण आणि युसूफ पठाण – पठाण बंधुंनी मास्कचा तुटवडा असताना चार हजार मास्कचे वाटप केलं होतं. स्थानिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी हे वाटप केलं होतं. तसेच त्यांनी अन्नधान्यचंही वाटप केलं होतं. गोरगरीब आणि गरजुंना त्यांनी राशनचं वाटप केलेलं.
-
पुनम यादव > भारतीय महिला क्रिकेट संघातील लेग स्पीनर असणाऱ्या पुनम यादवने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी एक लाखांचा निधी दिलेला.
-
दिप्ती शर्मा > महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या दिप्तीने एकूण दीड लाखांचा निधी दिला होता. तिने पंतप्रधान सहाय्यता निधीसोबतच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये दिले होते.
-
रिचा घोष > १६ वर्षीय रिचा घोष हीने पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिलेला.
-
गौतम गंभीर > सध्या भाजपाचा खासदार असणाऱ्या गंभीरने मागील वर्षी २८ मार्च रोजी पंतप्रधान मदत निधीसाठी दोन वर्षांचा पगार देत असल्याची घोषणा केली. तसेच त्याने दिल्ली सरकारला स्थानिक विकास निधीसाठी मिळणाऱ्या खासदार निधीतून एक कोटी रुपये दिले.
-
त्याचप्रमाणे गंभीरने आपल्या खासदार निधीमधून गरिबांना स्वस्तात खाणं उपलब्ध करुन देणारं कॅन्टीनही सुरु केलं आहे.
-
बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या क्रिकेट संघटनांनी एकूण ५३ लाख २२ हजार रुपये सरकारला मदत निधी म्हणून दिलेले.
-
बीसीसीआयने स्वत: सरकारला मदत म्हणून ५१ कोटींचा निधी दिलेला.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग