-
दुकानं सुरू करण्यावरून कोल्हापूर शहरामध्ये सोमवारी सकाळी व्यापारी व प्रशासनामध्ये संघर्ष झाला. दुकानं सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. यावरुन आज कोल्हापूरमधील व्यापारी आणि पोलीस प्रशासनानमध्ये वाद झाला.
-
व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घातला.
-
कोल्हापूर शहरातील करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता.
-
गेले दोन आठवडे व्यापारी व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी लढा देत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी दुकानांसमोर उभे राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले होते.
-
गेले दोन दिवस कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. त्यामध्ये काही झाले तरी सोमवारपासून व्यापार सुरू केला जाणारच असा निर्धार व्यापाऱ्यांनी केला होता.
-
या मागणीसाठी आज व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.
-
सोमवारी सकाळपासून दुकानं सुरू करण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. साफसफाई केली जात होती.
-
पोलिसांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून दुकानं सुरू करू नका, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा सांगत असह्य जगणे सुरू आहे. आता व्यापार सुरू करणारच अशी भूमिका घेतली.
-
प्रशासनाने करोनाची साथ असल्याने संयम राखावा, असे आवाहन केले. त्यावर ही साथ संपणार तरी कधी, असा प्रतिसवाल व्यापाऱ्यांनी केला. यातून प्रशासन व व्यापारी यांच्यातील वाद वाढत राहिला.
-
या बाबी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर व्यापार सुरू करण्याच्या भूमिकेवर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे.
-
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या उद्योगनगरी इचलकरंजीतील सर्व दुकाने सोमवारी सुरू झाली.
-
करोना नियमाचे पालन करून इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली आहेत.
-
जीवनमरणाचा प्रश्न बनल्यामुळे व्यापारी वर्गाने दुकाने उघडली आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. इचलकरंजीतील व्यापारी वर्गाने एकजूट होऊन एकीचे दर्शन घडवले आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
-
‘इनाम’प्रणित इचलकरंजी व्यापारी असोसिएशनला सर्व व्यापारी संघटनांचा पाठिंबा दिला आहे.
-
त्यामुळे एकीकडे कोल्हापूरमध्ये करोना निर्बंधांमुळे प्रशासन दुकाने बंद करायला सांगत असल्याने दुकानदारांचे आंदोलन तर दुसरीकडे इचलकरंजीमध्ये दुकाने सुरु असं चित्र आज पहायला मिळालं.
-
पोलीस अधीक्षकांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..