-
नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले होते. डॉक्टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आणि औषधांचा मुबलक साठा नसणे या कारणामुळे हे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहुयात.
-
“काही विषय हे खूप वर्षांपासून जसेच्या तसे आहेत. गेले काही दिवस मी माझी प्रतिक्रिया दिली नव्हती. गणपती उत्सव होता, दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्यात मी विस्ताराने बोलणारच आहे. आज मी जरा अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. आरोग्य यंत्रणेचे बारा वाजले आहेत, ते पाहिल्यावर खरंच संताप येतो.”
-
“जेव्हा जगभरात करोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं होतं आणि मी मुख्यमंत्री होतो. परंतु, सध्या सरकार महाविकास आघाडीचं नाहीय. महाराष्ट्र तोच आहे, आरोग्य यंत्रणा तीच आहे. ज्या आरोग्य यंत्रणेनं जग व्यापून टाकणाऱ्या संकटाचा सामना केला, यशस्वीपणाने केला, त्याच महाराष्ट्राची दुर्दशा हे सरकार बदलण्यानंतर चव्हाट्यावर आली.”
-
“करोना काळात याच यंत्रणेने, हेच डॉक्टर होते, हेच डीन होते, परिचारिका हेच होते, वॉर्ड बायही हेच होते. त्यांनी जीवाची पराकाष्ठा करून रुग्णांचे जीव वाचवले. करोनावर इलाज नसतानाही जी औषधं वापरली जात होती, ती औषधं दुर्गम भागातही पोहोचवण्याचं काम या यंत्रणेने केलं होतं. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे दुर्गम भागात ड्रोनने औषध पुरवठा केला गेला होता. मी स्वतः नंदुरबारच्या टोकाच्या एका लसीकरण केंद्राला भेट दिली होती. कोठेही औषध, लसींचा तुटवडा नव्हता.”
-
गेले काही दिवस ठाणे, कळवा, छत्रपती संभाजी नगर, नांदेड येथील रुग्णालयाची माहिती समोर येतेय. पण जबाबदार कोण? महाराष्ट्रात हे संकट आल्यावर मुख्यमंत्री कुठे आहेत? ज्या सरकारला मी एक फूल दोन हाफ म्हणतो, त्यातील एक फुल आणि एक हाफ दिल्लीत आहेत. आणि दुसरं हाफ कुठेय हे माहिती नाही.
-
पण इकडे हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत नक्षलवाद्यांचा सामना कसा करायचा यासाठी बसले आहेत. नक्षलवाद्यांचं संकट आहेच, पण रुग्णालयातील जेवढे बळी गेले आहेत, तेवढे बळी गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातही गेले नाहीत.
-
मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की याठिकाणी जाऊन चौकशी करायला हवी होती. नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. जो गुन्हेगार असेल तर त्याला जरुर शिक्षा द्या. पण नेमक्या नांदेडच्या डीनवर गुन्हा का दाखल झाला? नागपूर, कळवामधील रुग्णालयाच्या डीनवर कारवाई झाली नाही. मग नांदेडच्या डीनवरच का झाली.
-
एका मस्तवाल खासदाराने डीनला शौचालय साफ करायला लावले. ते डीन कोणत्या जाती जमातीचे आहेत माहीत नाही. आदिवासी आहेत असं म्हणतात. मी कधीच जात पात पाहत नाही. संडास साफ करायला लावल्यावर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला गेला म्हणून धमकावण्यासाठी डीनवर गुन्हा दाखल केला आहे.
-
“औषधांचा तुटवडा राज्यभर आहे. मंत्री म्हणत आहेत की औषधं मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात औषधांचा खडखडाट आहे. मग असा दावा करणारे हे नेमके मंत्री कोण आहेत? आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. औषधांच्या मुबलकतेबाबत मंत्री दावा करत असताना दुसरीकडे चंद्रपूरच्या एका महिलेचा व्हिडीओ फिरत आहेत. औषधं बाहेरून आणण्यास सांगितलं असल्यांच ही महिला व्हिडीओत सांगत आहे. मग, पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हा सगळा खर्च केला जाणार आहे का? या योजनांतून मदत कोणाला दिली जाते? ही बिलं खरी आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे.”
-
करोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही, आज साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्याचं पोस्टिंगचंही रेट कार्ड ठरवलं गेलंय असं कानावर येतंय. औषधं खरेदीसाठीही निविदा प्रक्रिया बंद होणार आहे. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणार? निविदा प्रक्रिया बंद करून भ्रष्ट्राचाराचं दार उघडं केलं जातंय. आज सुद्धा जिथे जिथे औषधं खरेदी झालेली नाही तिकडे कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.”
-
मागे युती सरकारच्या काळात धरण फुटलं तेव्हा खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं असं सांगण्यात आलं. खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का, ते भ्रष्टाचाराचं पाणी आपल्याकडे वळवत आहेत का? स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत, गुजरातमध्ये जाण्यास पैसे आहेत, सुरतमध्ये जाण्यास पैसे आहेत, गोव्यात जाऊन टेबलवर नाचायला पैसे आहेत, पण महाराष्ट्रातली रुग्णांचे जीव वाचवायला पैसे नाहीत”,
-
भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे बळी जायला लागले आहेत. ज्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, सर्वांना सांगतो आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात जाऊन डीन आणि डॉक्टरांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. औषधांचा पुरवठा होत नाही तो त्यांचा गुन्हा नाही. जोपर्यंत आमचं सरकार होतं, महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात किती साठा आहे, तो साठा आणि पुरवठा संगणकीय होत होतं, ही पद्धत आता चालू आहे का, नसेल तर कोणी बंद केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
-
“माझ्यावेळेला अजित पवारांची अशी नाराजी मी पाहिली नव्हती. माझ्यावेळेला ते माझ्यासोबत चांगले होते. पण, ते चांगलं काम करत होते म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होतं त्यांच्या उरावर अजितदादा आता बसलेले आहेत. त्यामुळे खरं अजितदादा ज्यांच्यामुळे उरावर बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजेत. आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांच्याही ते उरावर बसलेत त्यामुळे त्यांनीही नाराज व्हायला पाहिजे.”
-
शिवसेनेचा शिवतीर्थावर दरवर्षी दसरा मेळावा होतो. या मेळाव्यातून वैचारिक सोनं लुटलं जातं. मात्र, गेल्यावर्षीपासून शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. गेल्यावर्षी उच्च न्यायालायने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला होता. यंदा शिवतीर्थावर कोण भाषण करणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंनी नांदेड प्रकरणी सरकारवर तोफ डागली आहे. (संग्रहित छायाचित्र)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा