जळगाव : जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर झाले असून महायुतीतील तीनही घटकपक्षांनी कोणताही धोका न पत्करता विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाच उमेदवारी दिली आहे. चोपडा, एरंडोल आणि रावेर या जागांवर आमदारांच्या आणि माजी खासदारांच्या नातेवाईकांना तर, उर्वरित आठ जागांवर विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक इतर पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांच्या यादीत चार आमदारांना पुन्हा स्थान देण्यात आले आहे. त्यात भुसावळचे संजय सावकारे, जळगाव शहराचे सुरेश उर्फ राजूमामा भोळे, चाळीसगावचे मंगेश चव्हाण, जामनेरचे गिरीश महाजन यांचा समावेश आहे. रावेरसाठी माजी खासदार दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि मुक्ताईनगरसाठी विद्यमान आमदारांना आणि चोपडा, एरंडोलच्या जागांसाठी आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार यंदा पुन्हा उमेदवारी मिळालेल्या आमदारांमध्ये मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील आणि पाचोऱ्याचे किशोर पाटील यांचा समावेश आहे. एरंडोलसाठी आमदार चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील यांना तर, चोपड्यात आमदार लता सोनवणे यांच्याऐवजी त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : झारखंड विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपाच्या १२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पक्षावर घराणेशाहीचा आरोप

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) जिल्ह्यातील एकमेव अमळनेर मतदारसंघ आला आहे. या मतदारसंघात मंत्री अनिल पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon district mahayuti given candidature to sitting mlas and relatives of mla print politics news css