लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. एकीकडे भाजपाच्या पराभवासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गजर व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र हेच पक्ष एकमेकांवर टीका करण्याचा एकही संधी सोडत नाहीयेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपा स्वत:च्या फायद्यासाठी काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांना ‘नायक’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या याच वक्तव्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी विरोधकांची एकजूट कमकूवत करण्याचा प्रयत्न कत आहेत. तृणमूल काँग्रेस ‘ट्रोजन हॉर्स’ आहे, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> खलिस्तानसमर्थकांवरील कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने आम आदमी पक्ष, केंद्र सरकारचे केले कौतुक

ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जिंकण्यासाठी मदत केली

पश्चिम बंगाल काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. कुटुंबियांविरोधात सुरू असलेल्या चौकशीमुळे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे, असे चौधरी म्हणाले. “भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश कोणामुळे झाला, याची प्रत्येकालाच कल्पना आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाला लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी मदत केली. आता ममता बॅनर्जी भाजपा विरोधी आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली.

तृणमूलने भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे

तृणमूल काँग्रेस आगामी निवडणुका एकट्याने लढवेल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. यावर बोलताना “ममता बॅनर्जी विरोधकांच्या गटात ट्रोजन हॉर्स आहेत. तृणमूलने भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सीबीआय, ईडीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तृणमूलने ही भूमिका घेतलेली आहे,” असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.

हेही वाचा >> भाजपाकडून राहुल गांधी लक्ष्य होत असताना काँग्रेस अजूनही विरोधकांची मोट बांधण्यात अपयशी

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?

मुर्शिदाबाद येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते आणि नेत्यांना संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. “राहुल गांधी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत मोदी यांच्याविषयी कोणीही वाईट विचार करणार नाही. तृणमूल काँग्रेसने भाजपापुढे शरणागती पत्करलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस भाजपाचा मित्रा आहे. काँग्रेसनेच भाजपापुढे शरणागती पत्करलेली आहे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee criticises rahul gandhi congress also reply prd
First published on: 21-03-2023 at 21:19 IST