पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट लोकनेते होते. ते सर्वसमावेशक नेते होते. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगले सबंध होते. ते मोठ्या उंचीचे नेते होते. त्यामुळे त्यांची आणि मोहोळ यांची तुलना होऊ शकत नाही. मोहोळ हे रस्त्यावर कधीही न फिरलेले नेते आहेत, बापट यांचे कार्यालय कोणी फोडले, हे पुणेकर अद्याप विसरलेले नाहीत, अशा शब्दांत आमदार आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबाग निवासस्थानी रविवारी भेट घेतली. शरद पवार यांनी धंगेकर यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी विविध विषयांवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार हे सहाही मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

धंगेकर म्हणाले, या भेटीदरम्यान पवार यांनी मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणेच आजचीही भेट अतिशय ऊर्जादायी होती. लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी, दडपशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला जनता भरभरून आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे.

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

मोहोळ यांनी प्रचारासाठी पहिलवान आणले आहेत, या प्रश्नावर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, त्यांच्याकडे पहिलवान असले तर आमच्याकडे ‘वस्ताद’ आहेत. वास्तविक, पहिलवान हे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे ते मोहोळ यांना मदत करणार नाहीत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने ते आम्हालाच मदत करतील. मोहोळ यांनी आजवर पहिलवानांना अर्धा लिटर दूध कधी दिले नाही; त्यांनी केवळ बांधकाम व्यावसायिकांना दूध पाजले आहे.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या नाराजीवरही रवींद्र धंगेकर यांनी भाष्य केले. बागुल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना अनेक वर्षांचा राजकारणाचा, समाजकारणाचा अनुभव आहे. ते अत्यंत गोड, मृदू स्वभावाचे नेते आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, आम्ही सर्वजणांकडून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. काँग्रेसकडे २० जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यातून एकाची निवड दिल्लीतून झाली आहे. ही केवळ निवडणूक नाही; लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेली लढाई आहे. त्यामुळे बागूल आणि सर्वच नेते आपापल्या भागात, शहरात मेहनत घेऊन मोठे मताधिक्य काँग्रेसकडे खेचून आणतील, असा विश्वास आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish bapat muralidhar mohol cannot be compared ravindra dhangekar criticism pune print news apk 13 ssb
Show comments