पिंपरी : पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवारांच्या विधानानंतर ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल असा दावा करणाऱ्या भाजपला माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. विलीन होण्यास शिवसेना छोटा पक्ष आहे काय? बाप बदलण्याची मला गरज नाही. भाजपकडे काही मुद्दे नसल्याने जनतेचे लक्ष विचलित केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर बुधवारी (८ मे) सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, चंद्रकांत हंडोरे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाच्या भुताची भीती वाटतेय म्हणून रामराम करत महाराष्ट्रातील गल्ली बोळात फिरत आहेत. मुंबईत रोड-शो करणार आहेत. त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. दहा वर्षात जनतेचे प्रेम का मिळवू शकले नाहीत, असा सवाल करत ठाकरे म्हणाले, की ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल. नोटबंदीप्रमाणे मोदी यांचे नाणे राज्यातील जनता बंद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनीच नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा निर्णय होता असे सांगितले आहे. १५ लाख रुपये खात्यावर देणार, अच्छे दिन, दोन कोटी रोजगारांचे काय झाले. ज्या शिवसेनेने पंतप्रधानपदापर्यंत पोहोचविले, त्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली आहेत. भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलायची आहे. त्यासाठीच चारेशपारचा नारा दिला जात आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांच्या पतीनेच निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. त्यामाध्यमातून भाजपच्या खात्यावर हजारो कोटी रुपये गेले आहेत.

हेही वाचा >>>ऐन उन्हाळ्यात साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना दिलासा; किती दिली एफआरपी?

यंत्रणा हाताशी घेऊन कारभार करत आहेत. अंमलबजावणी संचानलाय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) निवडणूक आयोग आणि लवाद हे भाजपचे घरगडी आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना दिली. शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल शिंदे यांनी मोदी, शहांचे आभार मानले आहेत. मग, निवडणूक आयोगाच्या सुनावण्या हे सर्व नाटक केले का, असा सवालही त्यांनी केला. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. तत्कालीन केंद्रीय कायदामंत्री किरण रिजूजू यांनी न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण, कणखर न्यायमुर्तींनी तो हाणून पाडला. लोकसभेत बहुमताच्या जोरावार न्यायालयाने दिलेले निर्णय बदलले जात आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

मोदींच्या राजाश्रयामुळे आमदारांची खरेदी

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की आता योग्य निर्णय घेतला नाही. तर, देशात लोकशाही राहणार नाही. पुन्हा निवडणूक होणार नाही. राज्यघटना बदलली जाईल. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, हमीमालाला भाव आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात देशाची निवडणूक होत आहे. मोदी यांना अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही. देशावर दोनशे लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पेट्रोल, डिझेलवर मोठा कर लादला आहे. सरकारी उद्योगांची विक्री केली जात आहे. जगातील सर्वात भ्रष्ट सरकार मोदींचे आहे. त्यांच्या राजाश्रयामुळे महाराष्ट्रातील आमदारांची खरेदी-विक्री झाली.

खोटे बोलणे हीच मोदी यांची हमी

गद्दारांना माफी देऊ नका, त्यांना पराभूत करावे. भाजपने पक्ष चोरले. दोन कोटी नोक-या, महागाई कामे करणे, काळा पैसा, १५ लाख खात्यावर टाकण्याचे काय झाले. खोटे बोलणे हीच मोदी यांची हमी (गरँटी) आहे. देशातील सर्व भ्रष्टाचारी भाजपसोबत आहेत. राज्यघटना, आरक्षण, निवडणुका घेणे बंद करण्याचा भाजपचा इरादा असल्याचा आरोप खासदार सिंह यांनी केला.                                               

डोळ्यात तेल घालून सतर्क रहावे

बारामतीप्रमाणे मावळातही पैशांचे वाटप होईल. त्यामुळे पैशांचे वाटप करणा-यांना पकडावे आणि पोलीस ठाण्यात घेऊन जावे. डोळ्यात तेल घालून सतर्क रहावे. प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करावे. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वात भ्रष्ट आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाईला हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे रहावे, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले.