गेल्या आठवड्यात आपण कांदा धोरण समितीची कार्यकक्षा आणि कांद्याच्या बाजारपेठेमध्ये स्थिरता येण्यासाठी आधुनिक व्यापार व्यवस्थेचा स्वीकार करणे कसे गरजेचे आहे, यावर चर्चा केली होती. अशा प्रकारच्या व्यवस्थेचा विचार आणि संशोधन संस्थात्मक पातळीवर यापूर्वी झालेले आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी याबाबत निर्णय घेण्यात चालढकल केली गेली आहे. अलीकडील काळात व्यापार जगतात आलेले डिजिटल परिवर्तन पाहता कांद्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक’ प्रणालीचा वापर करायला योग्य वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या देशातील बहुतेक भागांत मोसमी पाऊस पोहोचला असून एकंदर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप अधिक राहिले आहे. अनेक ठिकाणी पेरण्या लवकर झाल्या आहेत तर काही ठिकाणी अतिपाऊस झाल्यामुळे पीक वाहून जाणे, दुबार पेरणी करावी लागणे अशा समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. परंतु सरकारी आकडे पाहिल्यास एकंदर खरीप पेरण्या चांगल्या झाल्या आहेत.