कल्याण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात असली तरी डोंबिवलीत मात्र या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील कलगीतुरा कायम असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मनसेचे डोंबिवलीतील एकमेव आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्वीट करत ‘नशिबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’ अशी जिव्हारी लागणारी टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांवर केली. डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या पलावा या उच्च शिक्षित वसाहतीमधील मालमत्ता कर कमी करण्याच्या मुद्दयावरून गेली काही दिवस खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि आमदार पाटील यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच आमदारांनी थेट मुख्यमंत्री पुत्रावर ट्वीट करत हल्ला चढविल्याची चर्चा आता रंगली आहे.
कल्याण लोकसभा क्षेत्र आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोठी वसाहत म्हणून पलावा वसाहतीकडे पाहिले जाते. येथील मालमत्ता कर कमी करण्यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात विस्तवही जात नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पहायला मिळाले. या दोन नेत्यांमधील वाढता संवाद लक्षात घेता डोंबिवलीतही शिंदे-पाटील एकत्र दिसतील अशी आशा बाळगली जात होती. गुढीपाडव्यानिमित्त खुद्द मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आमदार पाटील सुखावले. असे असले तरी पलावा वसाहतीच्या मालमत्ता कराच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी टोलेबाजी करत थेट मुख्यमंत्री पुत्रावरच निशाणा साधल्याचे पहायाल मिळत आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकाला दोन भामट्यांनी लुटले
काय आहे प्रकरण ?
पलावा ही एकात्मिक नागरी वसाहत (टाऊनशिप) आहे. या वसाहतींसाठी शासनाची कर वसुलीसाठी विशेष नियमावली आहे. या वसाहती उभ्या राहत असताना विकासक येथील रहिवाशांकडून सर्व प्रकारचे अधिभार, कर वसुली करत असतो. या वसाहतींमधील कचरा विल्हेवाट, रस्ते, पाणी सुविधा, मल, जल निस्सारण प्रकल्प याची उभारणी आणि अंमलबजावणी वसाहतीचे व्यवस्थापन करत असते. पलावाचा मालमत्ता कर पालिकेने कमी करावा यासाटी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. खा. शिंदे यांच्याकडेही स्थानिक रहिवाशांनी या मागणीसह धाव घेतली होती. स्थानिक आमदार या नात्याने राजू पाटील हेदेखील गेली तीन वर्षे या प्रश्नावर आक्रमक आहेत. हा प्रश्न निकाली लागेल असे चित्र असताना गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या मुद्दयावर अचानक सावध पवित्रा घेतल्याची मनसे नेत्यांची भावना आहे. दांगडे यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे या प्रश्नावर वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी मनसेचे नेते दबक्या सुरात करताना दिसतात.
मनसे आमदाराचे अखेर ट्वीकास्त्र
दरम्यान याच मुद्दयावरून आमदार पाटील यांनी ‘नशिबाने तुम्हाला हत्ती दिले आहेत. तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका,’ असे खरमरीत ट्वीट करत थेट खासदार शिंदे यांना धारेवर धरल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवलीतील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेल्या काही वर्षांपासून शासन मंजूर करत आहे. या मुद्यावरूनही यापूर्वी पाटील आणि शिंदेमध्ये श्रेयवाद रंगल्याचे पहायला मिळते. आमदार पाटील संधी मिळताच खासदार शिंदे यांना लक्ष्य करतात हेदेखील यापूर्वी पहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानाच्या पदावर विराजमान झाल्यानंतर पाटील विरुद्ध शिंदे यांच्यात ट्विट युद्ध संपले होते. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना थेट चप्पल चोराची उपमा दिल्याने मनसे आणि शिंदे सेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.