कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा ते मानपाडा गाव हद्दीतील नेकणीपाडा बस थांब्याजवळ वाहतूक आणि बस थांब्यावरील प्रवाशांना अडथळा होईल, अशा पद्धतीने गेल्या दोन दिवसांपासून रात्रंदिवस बेकायदा खोलीचे बांधकाम करून त्यात एका शिवसैनिकाने शिवसेनेची शाखा सुरू केली आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे बांधकाम सुरू असताना त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसीने कारवाई केली नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिळफाटा हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फाचे गाळे, टपऱ्या, पक्की, कच्ची बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेचा ई प्रभाग साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी वेळोवेळी जमीनदोस्त केले आहेत. या बेकायदा बांधकामातील शिवसेना शाखेवरील फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या प्रतीमा आहेत.

हेही वाचा : ठाणे लोकसभा कोण लढवणार? भाजपची जम्बो बैठक, शिंदे गटात अस्वस्थता

बेकायदा बांधकामात शाखा

गेल्या आठवड्यापासून सचीन कासार हा शिवसैनिक शिळफाटा मुख्य रस्त्याच्या कडेला बेकायदा बांधकाम उभारणीसाठी प्रयत्नशील होता. कासार यांनी सोनारापाडा भागातील शिळफाटा रस्त्यावरील केडीएमटीच्या नेकणी पाडा बस थांब्या जवळची मोक्याची जागा बांधकामासाठी निश्चित केली. दोन दिवस एमआयड़ीसी, पालिका कार्यालयांना सुट्टी असल्याने त्याचा गैरफायदा घेत वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा बांधकाम घाईने पूर्ण केले. या बांधकामात शिवसेना शाखा सुरू करून त्यावर फलक लावून शिवसेना नेत्यांच्या प्रतीमा झळकवल्या आहेत. सोनारपाडा, नेकणीपाडा ग्रामस्थ, डाॅ. शोभा साळुंखे यांनी एमआयडीसीत तक्रार केली. त्याची दखल घेतली गेली नाही. स्थानिक रहिवाशांनी सांगितले, सचीन कासार यांनी डोंबिवलीतील मोठागाव मधील एका माजी लोकप्रतिनिधीचा आधार घेत हे बेकायदा बांधकाम केले आहे.

हेही वाचा : रेल्वे प्रवासी संघटनांचे ३१ मार्चला ‘भीक मागो’ आंदोलन; कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर समस्यांचा डोंगर

एमआयडीसीचे दुर्लक्ष

शिळफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजुने एमआयडीसीच्या जलवाहिन्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांवर भराव टाकून, काही ठिकाणी गटारे बुजवून बिअर बार, हाॅटेल्स, टपरी, गाळेधारकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. तरीही एमआयडीसीच्या डोंबिवली शाखेचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड, बांधकाम विभागाचे अभियंता कारवाई करत नसल्याने प्रवासी, लगतच्या गावातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. नेकणीपाडा येथील बेकायदा बांधकामाविषयी एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना संपर्क साधला, त्यांनी नेहमीप्रमाणे आपण बैठकीत व्यस्त आहोत, असे प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा : मुंबई- नवी मुंबई- बदलापूर नवा मार्ग?

शिळफाटा रस्त्यावर नेकणीपाडा बस थांब्याजवळ बेकायदा बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. या बांधकामाची पाहणी करून पोलीस बंदोबस्त घेऊन हे बेकायदा बांधकाम तोडून टाकले जाईल. शिळफाटा रस्त्यावरील सर्व बेकायदा बांधकामे गेल्या आठवड्यात हटविण्यात आली आहेत.

भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.

नेकणीपाडा येथे रस्ता बाधित करून कोणी नव्या बांधकामात शिवसेना शाखा सुरू केली असेल. त्याविषयी तक्रारी असतील तर नक्कीच ही माहिती वरिष्ठांना देऊन कारवाईसाठी सूचित केले जाईल.

राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, डोंबिवली
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On kalyan shilphata road shivsena worker started illegal construction for shivsena branch css