Kalyan Exit Poll 2024 Result Updates : देशभरातील विविध माध्यमांनी एक्झिट पोल्स जाहीर केले असून विविध मतदारसंघाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. अटीतटीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात कडवी लढत झाली. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. तर, ठाकरे गटाने गृहीणींचा चेहरा म्हणून वैशाली दरेकर यांना संधी दिली होती. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा हा गड कोण राखतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार या जागेवरून श्रीकांत शिंदेंना पुन्हा संधी मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला अडचणीत आणण्याची खेळी ठाकरे गटाकडून खेळली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण ठाकरे गटाने नवखा चेहरा रिंगणात उतरविल्याने अटतटीची लढत होण्याची शक्यता कमी वाटत होती. परंतु, निवडणुकीची रंगत वाढत गेली तशी स्पर्धाही कठीण होत गेली. महायुतीतील अंतर्गत वाद, अर्धवट राहिलेली विकासकामं, कळवा मुंब्रातील विरोध  ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री पुत्राला कल्याण लोकसभेची निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मकच ठरली.

हेही वाचा >> मतदारसंघाचा आढावा : कल्याण- डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरे गटाचे आव्हान कितपत?

‘गद्दारांच्या घराणेशाहीला एक महिला धडा शिकवेल’ हा ठाकरे गटाने या निवडणुकीत प्रचार सुरू केला. वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीने शिंदे समर्थकांना आता निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र असताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने संपूर्ण मतदारसंघात अत्यंत नियोजनबद्ध असा प्रचार केला. गोळीबार प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड समर्थक अंतर्मनाने कोठे आहेत तेच कळत नाहीत. आमदारांची पत्नी उघडपणे ठाकरे गटाच्या प्रचारात सहभागी झाली होती. कल्याण लोकसभेत अडीच हजार कोटीची विकास कामे केल्याचा दावा श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जात असला तरी, या कामांना नाराजांचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा >> Exit Poll 2024 : संभाव्य अंदाजांवरुन महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीकडे; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे विश्लेषण…

श्रीकांत शिंदेंकडे पुन्हा येणार धुरा?

अशा विविध परिस्थितीमुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहणार असला तरीही ठाकरे गटाकडे की शिंदे गटाकडे जाणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नाचं उत्तर ४ जून रोजी मिळेलच. परंतु, तुर्तास TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ही जागा श्रीकांत शिंदेंना पुन्हा मिळणार असून तेच येथे विजयाची हॅट्ट्रीक मारतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे झाले तर शिंदे गटासाठी ही सर्वांत मोठी अभिमानाची आणि श्रेयाची बाब ठरेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrikant shinde or vaishali darekar who will beat the battle lok sabha election exit poll results 2024 sgk