Irfan Pathan Criticized Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ च्या ३८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड बघावे लागले. २२ एप्रिल रोजी जयपूरच्या मानसिंग स्टेडिमयवर राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत केवळ तीन सामने जिंकू शकलाय. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर सातत्याने टीका होतेय. याच राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतक झळकवले आणि संदीप शर्माने पाच विकेट घेतल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा दारुण पराभव झाला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला लक्ष्य केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करीत मुंबई इंडियन्स संघाच्या खराब कामगिरीसाठी हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे. तो ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, ती टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही, असे इरफान पठाण म्हणाला.

यावेळी त्याने यशस्वी जैस्वालचे कामगिरीचेही तोंडभरून कौतुक केले आहे.

इरफान पठाणने हार्दिक पंड्याला सुनावले

हार्दिक पंड्या आयपीएलच्या फॉर्मममध्ये वापसी करण्यासाठी सोपे मार्ग शोधत आहे. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सहकारी खेळाडूंकडून आदर मिळत नाही. जेव्हा ओपनर धावा काढतात तेव्हा ते फलंदाजीच्या क्रमाने पुढे येतात आणि जेव्हा विकेट झटपट पडतात तेव्हा तो टीम डेव्हिड नेहल वढेरा यांना पुढे पाठवतो. अशा प्रकारे तुम्ही संघात आदर मिळवू शकत नाही, अशा शब्दांत इरफान पठाणने मुंबई इंडियन्स संघाच्या सततच्या पराभवासाठी हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे.

इरफान पठाण पुढे म्हणाला की, हार्दिक पंड्याची हिटिंग पॉवर कमी होत आहे, ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही. हार्दिक पंड्याला यंदाच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनविण्यात आले; पण संघाची कामगिरी फारच खराब दिसत आहे. मुंबई इंडियन्सला आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू की काय, असा धोका सतावतोय, असे म्हणत इरफान पठानने पंड्याला लक्ष्य केले आहे.

यशस्वी जैस्वालचे तोंडभरून कौतुक

इरफान पठाण यशस्वी जैस्वालचे तोंडभरून कौतुक करीत म्हणाला की, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. पण, तेव्हाही तो १४० च्या स्ट्राइक रेटने धावा करीत होता. त्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे.